Marathi e-Batmya

मुंबई शहराच्या विविध छटा’ टिपण्याची छायाचित्रप्रेमींना संधी

मुंबईची वैविध्यपूर्ण जीवनशैली, संस्कृती आणि दैनंदिन अनुभव छायाचित्रातून मांडण्याची संधी छायाचित्रप्रेमींना मिळणार आहे. महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळ-एमटीडीसी, पर्यटन विभाग आणि जिल्हाधिकारी कार्यालय, मुंबई शहर यांच्या संयुक्त विद्यमाने ‘मुंबई पर्यटन’ अंतर्गत ‘मुंबई शहराच्या विविध छटा’ या विषयावर छायाचित्रण स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. या स्पर्धेसाठी २२ सप्टेंबर २०२६ पर्यंत प्रवेशिका स्वीकारण्यात येणार आहेत.

मुंबईतील संस्कृती, उत्सव, वारसा, निसर्ग, व्यक्ती, वास्तुकला आणि दैनंदिन जीवनातील अनुभव छायाचित्रणाच्या माध्यमातून सर्जनशीलपणे सादर करण्यास प्रोत्साहन देणे, हा या स्पर्धेचा उद्देश आहे. मुंबईतील केवळ प्रसिद्ध स्थळांपुरते मर्यादित न राहता शहरातील विविध पैलू, कथा, भावना आणि अनुभव वेगळ्या दृष्टिकोनातून एका छायाचित्रात मांडण्याचे आवाहन स्पर्धकांना करण्यात आले आहे.प्रत्येक स्पर्धकाला विषयाशी संबंधित एक मूळ छायाचित्र सादर करता येईल. छायाचित्र उच्च-रिझोल्यूशन जेपीईजी व जेपीजी स्वरूपात आणि कमाल १० एमबी आकाराचे असावे. किरकोळ स्वरूपातील संपादनास परवानगी असेल; मात्र कृत्रिम बुद्धिमत्तेद्वारे तयार केलेली छायाचित्रे स्वीकारली जाणार नाहीत. छायाचित्रावर कोणताही मजकूर, बॉर्डर, लोगो किंवा वॉटरमार्क नसावा.

स्पर्धकांनी छायाचित्रासोबत ते स्पर्धेच्या विषयाशी कसे संबंधित आहे, याचे थोडक्यात वर्णन द्यावे. प्रवेशिका सहभागीचे नाव आणि संपर्क तपशीलांसह mumbaitourism@maharashtratourism.gov.in या ई-मेलवर पाठवाव्यात.प्राप्त प्रवेशिकांची स्पर्धेच्या मार्गदर्शक तत्त्वांनुसार प्राथमिक छाननी करण्यात येईल. त्यानंतर पात्र छायाचित्रांचे एमटीडीसीने नियुक्त केलेल्या परीक्षकांमार्फत मूल्यमापन केले जाईल. विषयाशी संबंधितता, नावीन्य, रचना, तांत्रिक गुणवत्ता आणि एकूण प्रभाव आदी निकषांचा मूल्यमापनात विचार केला जाईल. छायाचित्रातून मुंबईची कथा, भावना अथवा वेगळा दृष्टिकोन प्रभावीपणे सादर करण्याला विशेष महत्त्व दिले जाईल.

स्पर्धेतील प्रथम, द्वितीय आणि तृतीय क्रमांकाच्या विजेत्यांना पारितोषिक व प्रमाणपत्र प्रदान करण्यात येईल. तसेच पात्र प्रवेशिकांसाठी सहभाग प्रमाणपत्र देण्यात येणार आहे. विजेत्यांचा एमटीडीसीतर्फे अधिकृत समारंभात गौरव करण्यात येईल.स्पर्धेसाठी सादर करण्यात आलेल्या छायाचित्रांचे कॉपीराइट हक्क एमटीडीसीकडे राहतील. या छायाचित्रांचा मुंबई पर्यटनाचा प्रचार, प्रकाशने आणि अन्य संबंधित प्रयोजनांसाठी वापर केला जाऊ शकतो. अशा वापराच्या वेळी लागू असल्यास संबंधित छायाचित्राच्या कॉपीराइट धारकाला योग्य श्रेय देण्यात येईल.

एमटीडीसीचे व्यवस्थापकीय संचालक नीलेश आर. गटणे म्हणाले की, “मुंबई हे असंख्य कथा आणि अनुभवांनी समृद्ध असे शहर आहे. प्रत्येक अनुभव मुंबईच्या वैशिष्ट्यपूर्ण व्यक्तिमत्त्वाची वेगळी झलक दाखवतो. या स्पर्धेच्या माध्यमातून छायाचित्रप्रेमींनी आपल्या सर्जनशील नजरेतून हे क्षण टिपावेत आणि मुंबईची विविध रूपे जगासमोर आणावीत, असे आमचे आवाहन आहे.अधिक माहितीसाठी 94257-17529 या मोबाईल क्रमांकावर संपर्क साधावा असे आवाहन करण्यात येत आहे.

Exit mobile version