महाराष्ट्र विधानसभा सार्वत्रिक निवडणूक २०२४ च्या २८८ मतदारसंघांकरिता २० नोव्हेंबर २०२४ रोजी मतदान झाले. या मतदानात एकूण ६ कोटी ४० लाख ८८ हजार १९५ मतदारांनी आपला सहभाग नोंदविला असून यामध्ये एकूण ३ कोटी ३४ लाख ३७ हजार ५७ पुरूष, ३ कोटी ६ लाख ४९ हजार ३१८ महिला तर १ हजार ८२० इतर मतदारांनी मतदान केले असल्याची माहिती मुख्य निवडणूक अधिकारी कार्यालयाने दिली आहे.
यावर्षीच्या निवडणुकीत मतदारसंघनिहाय आकडेवारी पाहता मतदार यादीतील नोंदीत महिलांमध्ये करवीर, चिमूर, ब्रम्हपूरी, नेवासा, कागल, आरमोरी, नवापूर, शाहूवाडी, कुडाळ तसेच पळुस-कडेगाव या मतदारसंघांत महिलांचा सहभाग सर्वांधिक दिसून येतो.
महाराष्ट्र राज्याच्या २८८ मतदारसंघाकरिता राज्यात एकूण ९ कोटी ७० लाख २५ हजार ११९ मतदार आहेत. यात ५ कोटी २२ हजार ७३९ पुरूष मतदार, ४ कोटी ६९ लाख ९६ हजार २७९ महिला मतदार तर ६ हजार १०१ इतर मतदार म्हणून नोंदीत आहेत. महाराष्ट्र विधानसभेच्या २०२४ च्या निवडणुकीत प्रत्यक्ष मतदान केलेले ६ कोटी ४० लाख ८८ हजार १९५ मतदार आहेत. यात प्रत्यक्ष मतदानात ३ कोटी ३४ लाख ३७ हजार ५७ पुरूष, ३ कोटी ६ लाख ४९ हजार ३१८ महिला तर १ हजार ८२० इतर मतदारांनी सहभाग नोंदवून आपला मतदानाचा हक्क बजावला.
२८८ मतदारसंघाचा मतदानाचा ताळेबंद पाहता, यावर्षी सर्वांधित मतदान हे करवीर मतदारसंघात म्हणजे ८४.९६ टक्के मतदान झाले तर सर्वांधिक कमी मतदान हे कुलाबा या मतदारसंघात झाले. कुलाबा या मतदारसंघात ४४.४४ टक्के मतदान झाल्याची नोंद आहे.
या निवडणुकीत झालेल्या मतदानाची अंतिम आकडेवारी मुख्य निवडणूक अधिकारी कार्यालयाकडून प्रकाशित झाली आहे. यात प्रत्यक्ष मतदान केलेल्या मतदारांचा समावेश आहे. प्रत्यक्ष मतमोजणी करतांना टपाली मतदानाचा समावेश करण्यात येईल. त्याचप्रमाणे मतदान केंद्राध्यक्षाद्यारे भरण्यात आलेला १७ सी हा प्रत्यक्ष झालेल्या मतदानासंदर्भातील फॉर्म उमेदवारांच्या प्रतिनिधींनाही देण्यात आला असल्याचेही मुख्य निवडणूक अधिकारी कार्यालयामार्फत स्पष्ट करण्यात येत आहे.
दरम्यान, आज निवडणूक मुख्याधिकारी कार्यालयाने तिसऱ्यांदा मतदानाच्या आकडेवारीत सुधारणा केली असून २० नोव्हेंबर रोजी संध्याकाळी ५ वाजेपर्यंत ५८ टक्के मतदान झाल्याची माहिती निवडणूक मुख्याधिकारी कार्यालयाकडून जाहिर करण्यात आली. त्यानंतर राज्यातील अनेक भागात रात्री आठ वाजले तरी मतदारांच्या लांबच लांब रांगा असल्याने तेथे मतदानाची प्रक्रिया सुरु होती. त्यामुळे रात्री उशीरा मुख्य निवडणूक आयोगाने ६१ टक्के मतदान झाल्याची आकडेवारी जाहिर केली. त्याच्या दुसऱ्या दिवशी ६४ टक्के मतदान राज्यात झाल्याची माहिती जाहिर करण्यात आली. आणि मतमोजणीच्या आदल्या दिवशी मतदानाच्या अंतिम टक्केवारीत आणखी १ टक्क्याने वाढ झाल्याची माहिती देत त्यासंदर्भातील तक्ताही जाहिर करण्यात आला.
लोकसभा निवडणूकीच्या कालावधीतही निवडणूक आयोगाकडून जवळपास दोन ते तीन वेळा मतदानाच्या आकडेवारीत सुधारणा करण्यात आली होती. त्यावर अनेकांनी आक्षेप नोंदविला होता. आता तीच अवस्था विधानसभा निवडणूकीतही झाली असून आता तिसऱ्यांदा जाहिर करण्यात आलेल्या आकडेवारीनुसार राज्यात ६६ टक्के मतदान झाल्याचे सांगण्यात आले आहे. तसेच संध्याकाळनंतर राज्यातील महिला मतदारांनी मोठ्या प्रमाणावर मतदान केल्याची माहिती देत महिला मतदारांचा टक्का वाढल्याचे सांगण्यात निवडणूक मुख्याधिकारी कार्यालयाकडून सांगण्यात येत आहे.
निवडणूक कार्यालयाकडून जाहिर करण्यात आलेली आकडेवारी खालीलप्रमाणेः
