Marathi e-Batmya

मंगलप्रभात लोढा यांचा इशारा, धारावीमध्ये कायदा हातात घेणाऱ्यांवर कठोर कारवाई

आज मुंबई महापालिकेद्वारे सायन धारावी परिसरातील एका प्रार्थनास्थळाचा अनधिकृत भाग तोडण्यासाठी मोहीम हाती घेण्यात आली होती. सकाळी महापालिकेच्या जी नॉर्थ प्रभागाचे अधिकारी या रस्त्यावर पोहोचले. यावेळी काही कट्टरपंथीयांनी प्रशासनाच्या कामात अडथळा आणण्यास सुरुवात केली. पोलीस आणि महापालिकेच्या अधिकाऱ्यांवर दगडफेक सुद्धा करण्यात आली. यामध्ये महापालिकेच्या बसेसचे नुकसान देखील झाले. सदर तणावपूर्ण परिस्थिती नियंत्रणात रहावी यासाठी मुंबई उपनगर जिल्ह्याचे पालकमंत्री मंगल प्रभात लोढा यांनी धारावी पोलीस स्टेशनला भेट दिली आणि संबंधित अधिकाऱ्यांसोबत चर्चा केली.

पुढे बोलताना पालकमंत्री मंगलप्रभात लोढा म्हणाले की, प्रार्थनास्थळावर कारवाई होणार असल्याची बातमी कळताच स्थानिक जमावाशिवाय वेगळा जमाव देखील येथे बोलावण्यात आला. मुद्दाम गर्दी जमवण्यात आली, गुंडागर्दी करून तणावाचे वातावरण निर्माण करण्यात आले, प्रशासनाच्या कामात अडथळा निर्माण केला आणि सरकारी अधिकाऱ्यांवर हल्ला देखील झाला असे सांगितले.

मंत्री मंगलप्रभात लोढा पुढे बोलताना म्हणाले की, अनधिकृत बांधकाम तोडणे हे महापालिकेचे काम आहे. त्यामध्ये कोणी आडकाठी आणू शकत नाही. ज्यांनी कायदा हातात घ्यायचा प्रयत्न केला, त्यांच्यावर नियमाप्रमाणे योग्य कारवाई होईल. पोलीस त्यांचे काम करत आहेत, त्यांच्याकडे सीसीटीव्ही CCTV फुटेज आहे आणि लवकरच दोषींना पकडण्यात येईल. प्रार्थनास्थळाचा अनधिकृत भाग तोडणे ही कायदेशीर कारवाई असून, ती नक्की होणार. लोकांना मुद्दाम भडकवून तणावपूर्ण परिस्थिती निर्माण करणे ही अतिशय निंदनीय बाब आहे असेही यावेळी सांगितले.

Exit mobile version