मुंबई पोलिसांनी अटी व शर्तीखाली राज्यातील मराठा आरक्षणाच्या प्रश्नावरून मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांच्या आझाद मैदानावरील एक दिवसीय आंदोलनाला परवानगी दिली. त्यानंतर आझाद मैदानावर ५ हजार मराठा आरक्षण समर्थकांना आंदोलन करण्यास परवानगी दिली. मात्र आज पहाटेपासून मुंबईत येत असलेल्या मराठा आरक्षण समर्थकांनी दुपारी १२ वाजेपर्यंत आझाद मैदान, सीएसटी, परिसरात हजारो आंदोलक पोहोचले. तर काही तरूण आंदोलकांकडून दक्षिण मुंबईतील मंत्रालय, विधिमंडळ परिसर, पी डिमेलो रोड आदी भागात आंदोलकांनी पाटील पाटील अशा घोषणा देत वाहतूक ठप्प पाडण्याचा प्रयत्न केला.
दक्षिण मुंबईतील बहुतांष रस्त्यावर भगवे उपरणे घातलेले अनेक मराठा आंदोलक मुंबईच्या रस्त्यावर आणि लोकल ट्रेनमध्ये दिसून येत होते. परंतु काल रात्रीपासून मुंबईत पावसाची संततधार सुरु असल्याने आझाद मैदानावर मोठ्या प्रमाणावर चिखल झाला. या चिखलातच राज्याच्या विविध भागातून आलेले आंदोलक आझाद मैदानावरील आंदोलनात सहभागी झाले. आझाद मैदान मराठा समाजाच्या आंदोलकांनी भरून गेले होते. तसेच आंदोलकांनी मोठ्या प्रमाणावर खाजगी वाहने घेऊन आले. परंतु माहिती असूनही राज्य सरकार किंवा पोलिसांनी आंदोलकांच्या वाहनांच्या पार्किंगची सोय केली नाही. त्याचबरोबर मुंबई महापालिकेकडून या आंदोलकांच्या सोयीसाठी मोबाईल टॉईलेट्सची सुविधा उपलब्ध करून देणे आवश्यक होते. परंतु आझाद मैदान परिसरात हजारो लोक येणार असल्याचा अंदाज आणि माहिती असतानाही मोबाईल टॉइलेटची सोय केली नाही. त्यामुळे या आंदोलकांनी सीएसएमटी स्थानकातील स्वच्छतागृहांचा वापर करण्याशिवाय गत्यंतर राहिले नाही.
मात्र काही केल्या मुंबईतील पावसाची रिपरिप थांबेना म्हणून संख्येने जास्त असलेल्या मराठा आंदोलकांनी सीएसएमटी स्थानक, सबवे, चर्चगेट आदी परिसरात पावसापासून बचाव करण्यासाठी सुरक्षित जागा घेतली. त्याचबरोबर मुंबईबाहेरून येणाऱे आणि मुंबईतील मराठा समाजाचे समर्थक हे लोकल सेवेने सीएसएमटी स्थानकात पोहोचल्यानंतर स्थानकातच थांबत होते. तसेच जेथे जागा दिसेल तेथेच बसत होते, तर बाहेरून आलेले आंदोलक सीएसएमटी स्थानकात दमलेल्या अवस्थेतच डुलकी घेण्याचा प्रयत्न घेत होते.
मनोज जरांगे पाटील यांच्यासोबत इतक्या मोठ्या प्रमाणावर आंदोलक त्यांच्या वाहनाने मुंबईत दाखल होतील याचा अंदाज दस्तूर खुद्द पोलिसांनाही आला नाही. त्यामुळे आझाद मैदानाच्या परिसरात मेट्रो, फॅशन स्ट्रीट आणि फ्रि वे-मार्ग, पी डिमेलो रोड आदीसह जेथे जागा मिळेल त्या ठिकाणी वाहने मराठा आंदोलकांकडून पार्क करण्यात येत आली. तसेच दिल्लीतील शेतकरी आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर मराठा आंदोलकांनी येतानाच सोबत किमान १० ते १५ दिवस राशन घेऊन आझाद मैदानात पोहोचल्याचे दिसून आले. त्यामुळे जो पर्यंत आरक्षण मिळणार नाही. तोपर्यंत मुंबईतून हलणार नसल्याचे या कार्यकर्त्यांकडून सांगण्यात येत होते.
