Marathi e-Batmya

मुंबई काँग्रेसची गुरुवारी २६ नोव्हेंबरला खेरवाडी जंक्शन ते जिल्हाधिकारी कार्यालय वांद्रे पूर्व मार्गावर ‘संविधान बचाव रॅली’

लोकशाही व संविधानाची पायमल्ली करणाऱ्या निवडणूक आयोग व भारतीय जनता पक्षाच्या काराभाराविरोधात काँग्रेस पक्षाने सत्याग्रह सुरु केला आहे. या सत्याग्रहानुसार संविधान दिनानिमित्त मुंबई काँग्रेसतर्फे गुरुवार,  २६ नोव्हेंबर २०२६ रोजी भव्य ‘संविधान बचाव रॅली’ चे आयोजन करण्यात आले आहे. खेरवाडी जंक्शन ते भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळा (जिल्हाधिकारी कार्यालयासमोर), वांद्रे पूर्व या मार्गावर ही रॅली आयोजित करण्यात आली असून दुपारी ३ वाजता रॅली सुरु होणार आहे. या रॅलीमध्ये काँग्रेस पक्षाचे महाराष्ट्र व मुंबई प्रभारी डॉ. सिरिवेल्ला प्रसाद, मुंबई काँग्रेसच्या अध्यक्ष खासदार वर्षा गायकवाड यांच्यासह पक्षाचे वरिष्ठ नेते, आमदार, खासदार व पदाधिकारी आणि कार्यकर्ते हजारोच्या संख्येने उपस्थित राहणार आहेत.

भारतीय जनता पक्षाचे सरकार निवडणूक आयोगाच्या मदतीने मतांची चोरी (वोटचोरी) करत आहे. एसआयआर (SIR) प्रक्रियेद्वारे लाखो नागरिकांना मतदानाच्या हक्कापासून वंचित ठेवले जात आहे. निवडणूक आयोग भाजपाच्या इशाऱ्यावर काम करत असून, थेट लोकशाही आणि संविधानाच्या मुळावर घाव घातला जात आहे. राहुल गांधी यांनी मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेशकुमार यांच्या राजीनाम्याची मागणी केली आहे पण भाजपा सरकार ज्ञानेशकुमार यांना वाचवत आहे. वोटचोरांचे राजीनामे होत नाहीत तोपर्यंत काँग्रेसचा हा लढा सुरुच राहणार असल्याची माहिती मुंबई काँग्रेसचे प्रवक्ते सुरेशचंद्र राजहंस यांनी दिली.

Exit mobile version