Marathi e-Batmya

समीर वानखेडेंना अटक करण्याआधी तीन दिवसांची नोटीस द्याः न्यायालयाचे आदेश

मुंबईः प्रतिनिधी
आर्यन खान ड्रग्ज प्रकरणात पंच असलेल्या के.पी.गोसावी याला आज अटक करण्यात आल्यानंतर बनावट जात प्रमाणपत्र आणि खंडणीप्रकरणी अटकेच्या शक्यतेने समीर वानखेडे यांनी आज उच्च न्यायालयात धाव घेत राज्य सरकारला अटक न करण्याचे आदेश द्यावेत अशी याचिका दाखल केली. त्यावर उच्च न्यायालयाने यासंदर्भात वानखेडे यांना अटक करण्यापूर्वी तीन दिवसांची नोटीस द्यावी असे आदेश राज्य सरकारला दिले.
एनसीबी विभागीय संचालक समीर वानखेडे सध्या वादाच्या भोवऱ्यात सापडले आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते नवाब मलिक यांनी समीर आणि त्यांच्या कुटुंबावर विविध आरोप केले आहेत. त्यांच्या विरोधात चार तक्रारी देखील दाखल झाल्या आहेत. त्यामुळे वानखेडे यांची उच्च न्यायालयात धाव घेत आपल्याविरोधात कोणताही गुन्हा दाखल झाल्यास त्याचा तपास सीबीआयने करण्याची आणि कठोर करवाईपासून संरक्षण देण्याची मागणी केली. दरम्यान, समीर वानखेडेंना उच्च न्यायालयाने तुर्तास दिलासा दिला आहे. तसेच न्यायालयाने समीन वानखेडे यांना अटक करताना ३ दिवसाआधी नोटीस देण्याचा आदेश राज्य सरकारला दिले.
राज्य सरकारने वानखेडे यांना अटक करायची झाल्यास तीन दिवसांपुर्वी नोटीस दिली जाईल, अशी हमी राज्य सरकारच्यावतीने न्यायालयात देण्यात आली.
आम्ही सध्या केवळ के. पी. गोसावीविरोधात तपास करत आहोत. तपासात पुढे काय येणार माहीत नाही. वानखेडे यांनी भीतीपोटी याचिका केल्याचा दावा राज्य सरकारने न्यायालयात केला.
समीर वानखेडे यांच्याविरोधात चार तक्रारी दाखल आहेत. त्यामुळे राज्य सरकार आपल्या विरोधात कारवाई करु शकते या भीतीपोटी वानखेडे यांनी न्यायालयात धाव घेतली होती. मात्र राज्य सरकारने वानखेडेंच्या याचिकेला न्यायालयात विरोध केला. दरम्यान न्यायालयाने वानखेडे यांच्याविरोधात कोणतीही कठोर कारवाई न करण्याचे आदेश दिले. तसेच दाखल तक्रारीमध्ये तथ्य असल्यास वानखेडे यांच्याविरोधात अटकेची कारवाई करायची असल्यास त्यांना ३ दिवसा आधी नोटीस देण्याचे आदेश न्यायालयाने दिले.

Exit mobile version