Marathi e-Batmya

एलिफंटाजवळ प्रवाशी बोट बुडालीः पण २१ जणांना वाचविण्यात यश

बुधवारी संध्याकाळी ३० ते ३५ प्रवाशांना घेऊन एक बोट निघाली होती. मात्र ती एलिफंटा गुफेजवळ येताच ती बुडायला लागली. या बोटीवरील एकूण प्रवाशांपैकी २१ प्रवाशांना वाचविण्यात यश आले असून एकाचा मृत्यू झाल्याचे सांगण्यात येत आहे. तसेच नौदल आणि मुंबई पोलिसांकडून प्रवाशांना वाचविण्यासाठी विशेष मोहिम हाती घेण्यात आली आहे.

एलिफंटा गुफा पाहण्यासाठी अनेक पर्यटक मुंबईत येत असतात. या पर्यटक प्रवाशांना घेऊन जाणारी नीलकमल नावाची फेरी बोट प्रवाशांना घेऊन निघाल्यानंतर उरण-कारंजा येथे बुडाल्याचे सांगण्यात येत आहे. या बोटीवर ३० ते ३५ प्रवाशी असल्याचे सांगण्यात येत आहे. या प्रवाशांना वाचविण्यासाठी नौदल, जेएनपीटी, तटरक्षक दल व येलो पोलिस ठाण्यातील पोलिस दल आणि स्थानिक मच्छिमार बोटींच्या मदतीने प्रवाशांना वाचविण्याचे प्रयत्न सुरु आहे. याशिवाय घटनास्थळी रूग्णवाहिकाही तैनात करण्यात आली आहे. दरम्यान घटनेची माहिती मिळताच सागरी सुरक्षा मंडळाचे अधिकारीही घटनास्थळी पोहचले असल्याची प्राथमिक माहिती मिळत आहे.

Exit mobile version