बदलापूरमधील शाळेतील दोन अल्पवयीन मुलींवरील लैंगिक अत्याचार प्रकरणातील आरोपी अक्षय शिंदेच्या आईने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व इतर राजकारणीविरोधात उच्च न्यायालयासह कनिष्ठ न्यायालयात बदनामीचा दावा केला आहे. राजकीय लाभासाठी आपल्या मुलाच्या पोलीस चकमकीचे समर्थन केल्याचा दावा करून शिंदेच्या आईने माफीसह नुकसानभरपाईची मागणीही केली आहे.
दोन बालिकांवर लैंगिक अत्याचार केल्याच्या आरोपांप्रकरणी अक्षयला ऑगस्ट महिन्यात अटक करण्यात आली होती. त्यानंतर, आपल्या कुटुंबीयांना बेघर करण्यात आले. समाजातून आपल्या कुटुंबाला बहिष्कृत ककेले गेले. मुलाचे फोटो प्रसिद्ध झाल्यानंतर आपल्या कुटुंबीयांवर प्राणघातक हल्लाही झाला, असा दावा शिंदेच्या आईने यचिकेत केला आहे. सध्या आपण कधी कल्याण स्थानकाजवळील बस थांबा किंवा स्थानकावर वास्तव्य करीत असल्याचे याचिकेत नमूद केले आहे. राजकारण्यांनी आपल्या मुलाच्या कथित चकमकीचे समर्थन करून बलात्काराच्या प्रकरणातील आरोपींना हीच शिक्षा मिळाली पाहिजे असे म्हटले होते. परंतु, राजकारण्यांची ही विधाने म्हणजे आपल्या मुलाला न्यायालयाने दोषी ठरवण्यापूर्वीच दोषी ठरवण्याचा प्रकार असल्याचा दावाही शिंदेच्या आईने केला आहे.
