Marathi e-Batmya

वाहन हस्तांतरण व ना हरकत प्रमाणपत्रासाठी आधार प्रमाणीकरणाची सुधारित प्रक्रिया

वाहनाच्या मालकी हक्क हस्तांतरणासाठी तसेच ना हरकत प्रमाणपत्रासाठी देशभरात एकसमान व प्रमाणित ऑनलाईन कार्यप्रवाह लागू करण्यात आला आहे. या सेवांसाठी संबंधित अर्जदाराचे आधार प्रमाणीकरण अनिवार्य प्रक्रियेचा भाग करण्यात आले आहे.

भारत सरकारच्या रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्रालयाने देशातील सर्व राज्ये व केंद्रशासित प्रदेशांमध्ये ऑनलाईन परिवहन सेवांची एकसमान व प्रमाणित पद्धतीने अंमलबजावणी करण्याच्या अनुषंगाने मालकी हक्क हस्तांतरण व ना हरकत प्रमाणपत्र सेवांसाठी सुधारित कार्यप्रवाह निश्चित करण्यात आला आहे. या कार्यप्रवाहास सक्षम प्राधिकाऱ्याची मान्यता प्राप्त झाली असून, त्यानुसार सेवांचा निपटारा करण्यात येत आहे.

वाहन नोंदणी प्रमाणपत्रावरील (आरसी) नाव आणि आधार कार्डवरील नाव यामध्ये तफावत आढळल्यास वाहन प्रणालीमध्ये “Please visit aadhar center to update the pin code or visit RTO/apply using mobile authentication, to avail contactless services. Name is not matching in vahan and aadhar.” असा संदेश दिसतो. त्यामुळे वाहन मालकांनी आपल्या आधार कार्डवरील नाव वाहन नोंदणी प्रमाणपत्रावरील नावाप्रमाणे दुरुस्त करून घेणे आवश्यक आहे. नावातील तफावत दूर झाल्यानंतर वाहन-4.0 प्रणालीमध्ये आवश्यक दुरुस्ती करून आधार प्रमाणीकरणाची प्रक्रिया पूर्ण करावी. त्यानंतरच वाहन मालकी हक्क हस्तांतरण किंवा ना हरकत प्रमाणपत्रासाठी अर्ज करावा.

वाहन प्रणालीतील हे बदल संपूर्ण देशभर लागू करण्यात आले आहेत. वाहनविषयक विविध ऑनलाईन सेवांचा सुरळीतपणे व संपर्करहित पद्धतीने लाभ घेण्यासाठी वाहन मालकांनी आधार कार्डवरील नाव, पत्ता आणि मोबाईल क्रमांक अद्ययावत करून घेण्याचे सह परिवहन आयुक्त (आय.टी.) शैलेश कामत यांनी एका प्रसिद्धीपत्रकाद्वारे केले आहे.

Exit mobile version