Marathi e-Batmya

आरटीओने फक्त “चॉईस” वर कमावले ४१ लाख रूपये

नागरिकांनी विविध आकर्षक क्रमांक व पसंती क्रमांकासाठी आरटीओ अर्थात परिवहन कार्यालयामध्ये येऊन अर्ज सादर केले आहेत. मान्यतेअंती पात्र अर्जदारांनी धनादेशाद्वारे व पसंती क्रमांकासाठी देय असलेले शासकीय शुल्क जमा केले आहे. यापोटी शासनाच्या तिजोरीमध्ये ४१ लाख ७३ हजार ६३३ रुपयांचा महसूल जमा झाला आहे.

आरटीओ अर्थात परिवहन कार्यालयाच्या एमएच ०३ ईएल या श्रृंखलेत विशेष करून ०००१ या क्रमांकासाठी ४ लाख रूपये, दोन वेगवेगळ्या क्रमांकांसाठी प्रत्येकी दीड लाख रुपये, ८ वेगवेगळ्या पसंती क्रमांकासाठी प्रत्येकी ७० हजार रुपये, १६ पसंती क्रमांकांसाठी प्रत्येकी ५० हजार रुपये, एका पसंती क्रमांकासाठी २२ हजार ५००, ४९ वेगवेगळ्या आकर्षक व पसंती क्रमांकांसाठी प्रत्येकी १५ हजार रुपये, ९८ विविध आकर्षक व पसंती क्रमाकांसाठी प्रत्येकी ७ हजार ५०० रुपये, ५४ पसंती क्रमांकांसाठी ५ हजार रूपये, अशा प्रकारे एकूण २२९ आकर्षक व पसंती क्रमांकांसाठी ३८ लाख २२ हजार ५०० रुपयांचा महसूल प्राप्त झाला आहे. १२ फेब्रुवारी पर्यंत एकूण २३४ अर्जदारांकडून आकर्षक व पसंती क्रमांकासाठी एकूण ४१ लाख ७३ हजार ६३३ रुपयांचा महसूल शासनास प्राप्त झाला आहे.

तसेच एकाच क्रमांकाला एकापेक्षा जास्त अर्जदारांनी अर्ज केल्यास त्या वाहन क्रमांकाचे लिलाव करून अर्जदाराला पसंती क्रमांकासाठी विहीत केलेल्या शासकीय शुल्का व्यतिरिक्त, अतिरिक्त शुल्क जमा करावे लागते. त्यानुसार या कार्यालयामध्ये ०९०१, ५०५०, ३३३३, ११११ व ६६९९ या पाच क्रमांकांसाठी एकापेक्षा जास्त अर्जदारांनी क्रमांक आरक्षित करण्याकरीता अर्ज सादर केला होता. या पाचही क्रमांकासाठी एकूण ११ अर्ज प्राप्त झाले होते. एकापेक्षा जास्त अर्ज प्राप्त झाल्याने या पाच क्रमांकाचा लिलाव करण्यात आला व त्या – त्या क्रमांकासाठी अर्जदारांनी एकापेक्षा अतिरिक्त शुल्क संबंधित कार्यालयात जमा करून क्रमांक आरक्षित केला. या पाच क्रमांकांसाठी लिलावाद्वारे एकूण ३ लाख ५१ हजार १३३ रूपये शासकीय महसूल प्राप्त झाला आहे.

दुचाकी व चारचाकी वाहनांची नोंदणी डिलर पॉइंट नोंदणी प्रणालीद्वारे ऑनलाईन पद्धतीने करण्यात येत आहे. खासगी चारचाकी वाहनांची मालिका एमएच ०३ ईएफ (MH03EF) ही पूर्ण झाल्याने चारचाकी वाहनांसाठी एमएच ०३ ईएल ही नवीन मालिका ६ फेब्रुवारी २०२४ रोजी सुरू करण्यात आली आहे. या श्रृंखलेत आकर्षक व पसंतीचा नोंदणी क्रमांक आरक्षित करण्यासाठी आवाहन प्रादेशिक परिवहन कार्यालय, मुंबई (पूर्व) यांच्यावतीने करण्यात आले आहे.

Exit mobile version