Marathi e-Batmya

१२ वी बोर्ड परीक्षेचा राज्याचा निकाल ९३.३७ टक्के

मुंबई मंगळवारी महाराष्ट्र माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने (राज्य मंडळ) बारावीचा निकाल जाहीर केला. यावेळी ९३.३७ टक्के निकाल लागला असून, गेल्या वर्षीच्या तुलनेत २ टक्के अधिक आहे. कोकण विभागाचा निकाल सर्वाधिक ९७.५१ टक्के तर मुंबई विभागाचा सर्वात कमी ९१.९५ टक्के लागला आहे. गतवेळेप्रमाणे परीक्षेच्या निकालातही मुलींनी बाजी मारली. मुलींचा निकाल ९५.४९ टक्के, तर मुलांचा ९२.६० टक्के लागला. छत्रपती संभाजी नगर येथील तनिषा सागर बोरणीकर या विद्यार्थिनीला १०० टक्के गुण मिळाले आहेत.

राज्य मंडळाच्या www.mahresult.nic.in या अधिकृत संकेतस्थळावर मंगळवारी दुपारी एक वाजता निकाल जाहीर करण्यात आला. यंदा १२ वीची परीक्षा २१ फेब्रुवारी ते २३ मार्च दरम्यान झाली होती. परीक्षेसाठी १५ लाख १३ हजार ९०९ विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती. यापैकी १४ लाख २३ हजार ९७० विद्यार्थी परीक्षेला बसले होते, त्यापैकी १३ लाख २९ हजार ६८४ विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. राज्य मंडळाच्या मुंबई, पुणे, नागपूर, छत्रपती संभाजीनगर, मुंबई, कोल्हापूर, अमरावती, नाशिक, लातूर आणि कोकण या ९ विभागीय विभागातील ३ हजार ३२० केंद्रांवर ही परीक्षा झाली. छत्रपती संभाजी नगर येथील तनिषा सागर बोरणीकर या विद्यार्थिनीला १०० टक्के गुण मिळाले आहेत. १०० टक्के गुण मिळवणारी ती महाराष्ट्रातील एकमेव विद्यार्थिनी आहे. विद्यार्थिनीला थेट परीक्षेत ५८२ आणि खेळात १८ गुण मिळाले, अशा प्रकारे तिला एकूण ६०० गुणांपैकी ६०० गुण मिळाले.

अनुत्तीर्ण विद्यार्थ्यांनी निराश होऊ नये.

शिक्षणमंत्री दीपक केसरकर यांनी बारावीच्या परीक्षेत यशस्वी झालेल्या विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले असून, नापास झालेल्यांनी निराश होण्याची गरज नाही. जुलै महिन्यात दुसरी परीक्षा घेतली जाईल आणि ऑगस्टमध्ये प्रवेश प्रक्रिया पूर्ण होण्यापूर्वी निकाल जाहीर केला जाईल, असे ते म्हणाले.

१० वीचा निकाल २७ मे रोजी लागण्याची शक्यता आहे

दीपक केसरकर म्हणाले की, राज्य बोर्डाच्या दहावीच्या परीक्षेचा निकाल २७ मे रोजी जाहीर होण्याची शक्यता आहे. साधारणपणे, १० वीच्या परीक्षेचा निकाल १२ वीच्या निकालाच्या दोन किंवा तीन आठवड्यांनंतर जाहीर केला जातो. आठवडाभर आधी निकाल जाहीर करण्याचा आमचा प्रयत्न असेल, असे केसरकर म्हणाले.

विभागनिहाय परीक्षेचा निकाल

कोकण : ९७.५१ टक्के

पुणे : ९४.४४ टक्के

नागपूर : ९२.१२ टक्के

छत्रपती संभाजी नगर : ९४.०८ टक्के

मुंबई : ९१.९५ टक्के

कोल्हापूर : ९४.२४ टक्के

अमरावती : ९३ टक्के

नाशिक : ९४.७० टक्के

लातूर : ९२.३६ टक्के

Exit mobile version