Marathi e-Batmya

धारावीत मस्जिदीचे वाढीव बांधकाम पाडण्यावरून तणाव

मागील काही वर्षांमध्ये धारावीतील मुंबई महापालिकेच्या मालकीच्या जमिनीवर अनेक ठिकाणी बांधकामे करण्यात आलेली आहे. इतकेच नव्हे तर पाण्याच्या पाईपलाईन करणाऱ्या जागेवरही येथील अनेकांनी अनधिकृतपणे घरे बांधली. त्याबाबत तेथील काही स्थानिक कार्यकर्त्यांनी मुंबई महापालिकेकडे तक्रारी दाखल केल्या, इतकेच काय एमआरटीपी कायद्याखाली पोलिसात तक्रार देण्यासाठी पुढाकारही घेतला. मात्र मुंबई महापालिकेच्या अधिकाऱ्यांना धारावीतील पोलिस स्थानकात रितसर येऊन फक्त हजर राहण्यास वेळ नाही. मात्र धारावीतीलच मुस्लिम समाजाचे प्रार्थना स्थळ असलेल्या मस्जिदीचे वाढीव बांधकाम झाल्याचे मुंबई महापालिकेला आढळून आले आणि ते वाढीव बांधकाम पाडण्यासाठी मुंबई महापालिका सर्व लमाजाम्यासह धारावीत पोहोचली. त्यावरून तणाव निर्माण झाला. काही स्थानिक नागरिकांनी मुंबई महापालिकेच्या या कारवाईला आक्षेप घेतला.

या सगळ्या घडामोडीत धारावीतील तणावग्रस्त ठिकाणी मुंबई महापालिकेच्या जाग आलेल्या अधिकाऱ्यांच्या विरोधात हल्लाबोल करण्याचा प्रयत्न केला. तसेच काही जणांनी दगडफेक करण्याचा प्रयत्न केला. अखेर पुढील अनर्थ नको म्हणून मस्जिदीच्या ट्रस्टने पुढील आठ दिवसात स्वतःच बांधकाम पाडण्याचे आश्वासन दिल्याने मुंबई महापालिकेने तेथून काढता पाय घेतला.

मुंबई महापालिकेचे पथक मस्जिदीच्या अतिक्रमित बांधकाम पाडण्यासाठी आल्याचे वृत्त वाऱ्यासाऱखे पसरले. त्यामुळे या परिसरातील अनेक मुस्लिम समुदायाचे नागरिकांनी आपला संताप व्यक्त करण्यास सुरुवात केली. तसेच मुंबई महापालिकेच्या पथकासमोर धरणे आंदोलनही सुरु केले. त्यामुळे धारावीत एकप्रकारची तणावग्रस्त परिस्थिती निर्माण झाली. तसेच मोठ्या संख्येने नागरिकांनी मुंबई महापालिकेच्या या कारवाईला विरोध दर्शविण्यास सुरुवात केली.

दरम्यान धारावीतील स्थानिकांनी सांगितले की, मस्जिद उभारून २० वर्षे झाले. त्यानंतर मुंबई महापालिकेला आता अतिक्रमण झाल्याची आठवण झाली. त्यामुळे ते आता अतिक्रमित भाग पाडण्यासाठी आले. वास्तविक पाहता ही चुकीची पद्धतीने ही कारवाई करण्याचा प्रकार असल्याचेही यावेळी मतही व्यक्त केले.

राज्यातील विधानसभा निवडणूकीची प्रक्रिया सुरु होण्यास काही दिवसांचा अवधी शिल्लक राहिलेला असताना मस्जिदीचे वाढीव बांधकाम पाडण्यासाठी मुंबई महापालिकेने पुढाकार घेतला असल्याने वेळ आणि कालावधीचा विचार करता मुंबई महापालिकेच्या हेतू विषयी शंका उपस्थित होत असल्याचा दावाही स्थानिक शेतकरी कामगार पक्षाच्या एका कार्यकर्त्यांने केला.

Exit mobile version