अपेक्षेनुसार आता दसऱ्याचा सण झाल्यानंतर कोणत्याही क्षण विधानसभा निवडणूकीची आचारसंहिता आता जाहिर करण्यात येण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. यापार्श्वभूमीवर मुंबई आणि महानगरात राहणाऱ्या मतदारांना महायुतीकडे आकर्षित करण्यासाठी मुंबईतल्या पाच प्रवेश मार्गांवरील पथकर अर्थात टोल हलक्या वाहनांसाठी माफ करण्याचा निर्णय आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला. बैठकीच्या अध्यक्षस्थानी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे होते. आज १४ ऑक्टोबर मध्यरात्री बारा वाजल्यापासून याची अंमलबजावणी सुरु होणार आहे.
राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत टोल माफी हलकी वाहने, शाळेच्या बसेस आणि एसटी बसेस या वाहनांना मिळणार आहे. सायन पनवेल महामार्गावर वाशी येथे, लालबहादूर शास्त्री रस्त्यावर मुलुंड येथे, पूर्व द्रुतगती मार्गावर मुलुंड येथे ऐरोली पुलाजवळ, पश्चिम द्रुतगती मार्गावर दहिसर येथील पथकर नाक्यावर याची अंमलबजावणी होईल. पथकरातून सूट दिल्यामुळे राज्य रस्ते विकास महामंडळास द्याव्या लागणाऱ्या भरपाईसाठी मुख्य सचिवांच्या अध्यक्षतेखाली समिती स्थापन करण्यात आली आहे.
टोल का भरावा लागत होता….
१९९३ साली राज्यात शिवसेना-भाजपा युतीचे सरकार असताना मुंबई शहरातील वाहतूक कोंडी सोडविण्यासाठी मुंबईत ५५ उड्डाणपूल उभारण्यात आले होते. त्या मंत्रिमंडळात सार्वजनिक बांधकाम मंत्री नितीन गडकरी यांनी हे ५५ उड्डाण पूल उभारण्याचा निर्णय घेतला होता. तसेच या उड्डामपूलाचा खर्च राज्यात विकल्या जाणाऱ्या पेट्रोल-डिझेलवरील किंमतीवर १ रूपयाचा अधिभार आकारून आणि मुंबईत प्रवेश करू इच्छिणाऱ्या वाहनांकडून टोल वसूलीतून जमा करण्याचा निर्णय घेतला होता. त्यामुळे वाशी नाक्यावर टोल वसुली करण्यात येत होती.
राजकीय पक्षांची मागणी
दरम्यान या पाचही एंन्ट्रीसह महाराष्ट्रातील सर्व टोल नाके बंद करावेत या मागणीसाठी मध्यंतरीच्या काळात महाराष्ट्र नवनिर्माण सेना (MNS), तसेच शिवसेनेतील उद्धव ठाकरे यांनी ही मागणी लावून धरली होती. उद्धव ठाकरे गटातील नेते आदित्य ठाकरे यांनी अलीकडेच पुन्हा या टोल माफीची मागणी केली होती.
मुंबईचे पाच प्रवेशद्वार – दहिसर, मुलुंड पश्चिम, वाशी, ऐरोली आणि मुलुंड पूर्व – या एन्ट्री पाँईटवर आज मध्यरात्रीपासून टोल माफी लागू होणार आहे.
