Marathi e-Batmya

शरद पवारांच्या घरावर एसटी कर्मचाऱ्यांचा हल्लाबोल, चपला आणि दगडफेक

राज्यातील एसटी कर्मचाऱ्यांच्या संपप्रश्नी मुंबई उच्च न्यायालयाने अंतिम निकाल दिल्यानंतर कर्मचाऱ्यांचे वकील गुणरत्न सदावर्ते यांच्यासह कर्मचाऱ्यांनी आझाद मैदानावर वलिजयोत्सव साजरा केला. पण आज अचानक दुपारी एसटी कर्मचाऱ्यांनी शरद पवार यांच्या सिव्हर ओक निवासस्थानावर हल्लाबोल करत पवारांच्या घरावर दगडफेक आणि चपलाफेक केली.
कर्मचाऱ्यांनी अशा पध्दतीने अचानक झालेल्या हल्यानंतर गोंधळाची परिस्थिती निर्माण झाली. परंतु खासदार सुप्रिया सुळे यांनी आंदोलकाशी चर्चेची तयारी दाखविली. परंतु संतप्त आंदोलकांनी चर्चा करण्याऐवजी शरद पवारांच्या विरोधात घोषणाबाजी करण्यास सुरुवात केली.
तरीही सुप्रिया सुळे या म्हणाल्या की, मला माझ्या वडील आणि आईची आणि मुलीची सुरक्षितता महत्वाची आहे. ते कसे आहेत हे पाहून येते आणि त्यानंतर मी तुमच्याशी चर्चा करण्यास तयार आहे. फक्त मला थोडा वेळ द्या आणि तुम्ही शांत व्हा मी तुमच्याशी चर्चा करेन असे आश्वासन दिले.
तरीही आंदोलक कर्मचारी शांत झाले नाहीत. त्यामुळे कर्मचाऱ्यांनी पवारांच्या विरोधात घोषणाबाजी सुरुच ठेवली.
दरम्यान, पोलिस दलाने सिल्व्हर ओक निवासस्थानी धाव घेत आंदोलकांना शांत करण्याचा प्रयत्न करत त्यांना निवासस्थानाच्या परिसरातून बाहेर काढले. त्यानंतर आंदोलकांना एका बसमध्ये बसवून पोलिस त्यांना घेवून गेले.
शरद पवारांच्या निवासस्थानी एसटी कर्मचाऱ्यांनी हल्ला केल्याचे वृत्त राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांमध्ये वाऱ्याच्या वेगाने पसरले. त्यानंतर मोठ्या प्रमाणावर कार्यकर्त्ये शरद पवारांच्या निवास्थानाकडे धाव घेतली. सिल्वर ओकबाहेर लगेच राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यानी सुरक्षेचे कडे केले.
काही वेळानंतर आंदोलक कर्मचाऱ्यांशी चर्चा करण्याच्या उद्देशाने सुप्रिया सुळे या पुन्हा बंगल्याबाहेर आल्या. मात्र आंदोलक कर्मचाऱ्यांना पोलिसांनी गाडी घेवून गेल्याने त्यांच्याशी चर्चा करता आली नाही. मात्र सुप्रिया सुळे यांनी प्रसारमाध्यमांचे आणि कार्यकर्त्यांचे, पोलिसांचे त्यांनी धन्यवाद आणि आभार मानले.

Exit mobile version