काही दिवसांपूर्वी राज्याच्या विविध भागात उष्णतेच्या अनेक लाटा येणार असल्याचा अंदाज वर्तविला होता. त्यापाठोपाठ राज्यातील अनेत भागात उष्णतेच्या लाटानंतर वादळी वाऱ्यानंतर अवकाळी पावसाचा अंदाज व्यक्त केला. त्यानुसार मागील दोन-तीन दिवसांपासून सातत्याने अवकाळी पावसाने राज्याच्या विविध भागात हजेरी लावली. त्यानंतर आज संध्याकाळी मुंबई ठाण्यासह आजूबाजूच्या परिसरात वादळी वाऱ्यासह मुसळधार अवकाळी पावसाने हजेरी लावली. त्याचा परिणाम इतका झाला की, मध्य रेल्वेची वाहतूक विस्कळीत झाली. तर घाटकोपर येथे एक मोठे होर्डींग कोसळल्याने मोठ्या प्रमाणावर नागरिक अडकल्याचे सांगण्यात येत आहे. तसेच पश्चिम रेल्वे मार्गावरही वाहतूक विस्कळीत झाल्याचे चित्र पाह्यला मिळाले.
गेले काही दिवस वाढत्या उष्णतेमुळे आधीच सर्वसामान्य मुंबईकर कासावसी झाला. त्यामुळे कधी एकदाचा सरतो उन्हाळा अशी मुंबईकरांची स्थिती निर्माण झाली. त्यातच दोन-तीन दिवसांपूर्वीच अवकाळी पावसाची हजेरी महाराष्ट्रातील अनेक भागात लागणार असल्याचा अंदाज हवामान खात्याने वर्तविला होता. त्यानुसार राज्याच्या विविध भागात कुठे गारपीट, तर कुठे अवकाळी मुसळधार पावसाची हजेरी लावल्याचे दिसून आले. त्यामुळे काही काळ का होईना अवकाळी पावसाच्या आगमनाने काही काळ उष्म वातावरणातून नागरिकांना दिलासा मिळाल्याचे चित्र निर्माण झाले. मात्र मुंबईत आज दुपारनंतर मात्र अचानक वातावरणात बदल झाला आणि वादळी वाऱ्यासह अवकाळी मुसळधार पावसाने हजेरी लावली.
या पावसामुळे अनेक भागात काही झाडे उन्मळून पडली, तर अनेक ठिकाणी विजेचे खांब वाकल्याचे चित्रही पाह्यला मिळाले. वादळी वारे आणि पावसाचा परिणाम इतका झाला की, मुंबईकरांची जीवन वाहिनी असलेल्या लोकल गाड्याचे वेळापत्रक कोलमडून पडले. त्यामुळे मुंबईकर प्रवाशांचे हाल होऊ लागले.
दरम्यान, घाटकोपर येथील पेट्रोल पंपाच्या परिसरात लावण्यात आलेले भले मोठे होर्डींग वेगवान वाऱ्यामुळे कोसळले. त्यामुळे अनेक वाहने आणि या परिसरातील अनेक नागरिक या कोसळलेल्या होर्डींग खाली अडकल्याचे सांगण्यात येत आहे. अडकलेल्या वाहनांचा आणि नागरिकांची नेमकी संख्या कळू शकली नाही. मात्र अडकलेल्यांच्या सुटकेसाठी एनडीआरएफला पाचारण करण्यात आले. सध्या एनडीआरएफकडून नागरिकांना सुरक्षितरित्या बाहेर काढल्याचे काम सुरु आहे. या घटनेची दखल मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनीही तात्काळ घेत योग्य ते निर्देश दिले.
