Marathi e-Batmya

यंदाच्या वर्षासाठी २५ टक्क्यानुसार कोणता अभ्यासक्रम वगळला? मग वाचा

मुंबई : प्रतिनिधी

शालेय वर्ष २०२०-२१ साठी कोरोना (कोव्हिड 19)प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर २५ टक्के शालेय पाठ्यक्रम कमी करण्यात आलेला आहे. यासंदर्भाने समाजशास्त्र व इतिहास विषयाच्या खालील अभ्यासक्रम-पाठ्यक्रम यंदाच्यावर्षीसाठी वगळण्यात आणि ठेवण्यात आला  याची माहिती.

कमी करण्यात आलेला पाठ्यक्रम स्वयं अध्ययनासाठी

इयत्ता १२ वी समाजशास्त्र विषयाच्या पाठ्यपुस्तकामधून  वगळलेले सर्व उपघटक हे स्वयं-अध्ययनासाठी आहेत. विद्यार्थी या उपघटकांचा स्वयंअध्ययनाच्या माध्यमातून अभ्यास करू शकतात . स्वयंअध्ययनासाठी देण्यात आलेल्या घटक तसेच उपघटकांवर परिक्षेमध्ये प्रश्न विचारले जाणार नाहीत. त्यांचे मूल्यमापन असणार नाही.

‘शेतकऱ्यांच्या आत्महत्या’ या विषयाचा इतर घटकात उल्लेख

इयत्ता १२ वी समाजशास्त्र विषयाच्या पाठ्यपुस्तकातील घटक ६ मधील उपघटक ‘शेतकऱ्यांच्या आत्महत्या’ हा शालेय वर्ष 2020-21 साठीच फक्त कमी करण्यात आलेला आहे. कारण याविषयी घटक २ मधील ग्रामीण समाजाच्या समस्या यामध्ये याविषयी माहिती देण्यात आली आहे. त्यामूळे पाठ वगळला असे म्हणने संयुक्तिक ठरणार नाही.

विविध शालेय  विषयांच्या माध्यमातून तसेच पूर्वीच्या इयत्तांमध्ये सामाजिक शास्त्राच्या संदर्भाने ज्या घटक / उपघटकांचे अध्ययन विद्यार्थ्यांनी केलेले आहे असे घटक पुनरावृती होऊ नयेत म्हणून फक्त या वर्षासाठी मूल्यमापनामधून वगळले आहेत. पाठ्यपुस्तकामध्ये काही नवीन उपघटकांचा  उदा., वृद्धांच्या समस्या, घरगुती हिंसाचाराची समस्या आणि व्यसन समस्या इत्यादींचा  अभ्यासक्रमानुसार नव्याने समावेश केलेला आहे. पाठ्यपुस्तकामधील इतर पाठांमध्ये ज्या उपघटकांविषयी लिखाण माहिती समाविष्ट केली आहे, विद्यार्थ्यांना स्वयंअध्ययनास अवघड वाटतील (समजून घेण्यास) असेच उपघटक चालू शैक्षणिक वर्षामध्ये मूल्यमापनासाठी विचारात घेतले जाणार नाहीत. विद्यार्थी या उपघटकांचे स्वयंअध्ययन करु शकतात.

का वगळले घटक?

इयत्ता दहावी, इतिहास – राज्यशास्त्र व  इयत्ता तिसरी ते दहावी  या वर्गांच्या इतिहास –  नागरिकशास्त्र – राज्यशास्त्र  या विषयांमधून  उपरोक्त प्रकरणे , घटक , उपघटक शालेय वर्ष 2020-21 साठी कमी करण्यामागील कारणे विभागाने दिली आहेत.

यामध्ये कोणताही पाठ कमी  करण्यामागे विशिष्ट असा हेतू नाही कारण संपूर्ण राज्यशास्त्र किंवा नागरिक शास्त्र हे विषय लोकशाही मूल्ये रुजवणारी आहेत. त्यामुळे त्यातील प्रत्येक पाठ महत्त्वाचा आहे. परंतु सध्याची स्थिती पाहता  प्रत्येक विषयाचा  पाठ्यक्रम कमी करावयाचा असल्याने भारतीय लोकशाहीसमोरील आव्हाने हा राज्यशास्त्रातील शेवटचा पाठ  केवळ याच शैक्षणिक वर्षापुरता कमी करण्यात आलेला आहे. या कडे लक्ष वेधुन, या  पाठातील घटक हे विद्यार्थ्यांना स्वयंअध्ययनातून  अभ्यासणे सोपे जाईल याचा विचार या ठिकाणी करण्यात आलेला आहे. असे स्पष्टीकरण शालेय शिक्षण विभागाने दिले आहे.

 

 

Exit mobile version