महाराष्ट्रातील ऊस उत्पादक शेतकरी आणि साखर उद्योगासाठी महत्त्वपूर्ण ठरणाऱ्या एका आंतरराष्ट्रीय अभ्यासदौऱ्याची तयारी पूर्ण झाली असून वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूट (VSI), पुणे येथील उच्चस्तरीय प्रतिनिधी मंडळ २६ एप्रिल २०२६ ते ८ मे २०२६ या कालावधीत ऑस्ट्रेलियातील शुगर रिसर्च ऑस्ट्रेलिया (SRA) या जागतिक स्तरावरील अग्रगण्य ऊस संशोधन संस्थेला भेट देणार आहे. या शिष्टमंडळात ज्येष्ठ नेते बाळासाहेब थोरात, माजी मंत्री राजेश टोपे यांच्यासह नामांकित शास्त्रज्ञांचा सहभाग असणार आहे.
या दौऱ्यामुळे महाराष्ट्रातील ऊस शेतीसाठी नवे तंत्रज्ञान, सुधारित ऊस वाण, साखर उतारा वाढविण्याच्या पद्धती आणि आंतरराष्ट्रीय संशोधन सहकार्याचा नवा मार्ग खुला होणार असल्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे.
प्रतिनिधी मंडळात VSI चे नियामक मंडळ सदस्य बाळासाहेब थोरात, राजेश टोपे, डॉ. अशोक कडलक (मुख्य शास्त्रज्ञ : पीक उत्पादन व संरक्षण), डॉ. कपिल सुशीर (मुख्य शास्त्रज्ञ : ऊस प्रजनन विभाग) तसेच डॉ. अशोक जगताप (शास्त्रज्ञ : रेणुजीवशास्त्र व जनुकीय अभियांत्रिकी विभाग) यांचा समावेश आहे.
शुगर रिसर्च ऑस्ट्रेलिया ही संस्था ऑस्ट्रेलियातील ऊस उद्योगासाठी संशोधन, विकास आणि तंत्रज्ञान प्रसाराचे महत्त्वपूर्ण काम करते. उत्पादकता, नफा आणि शाश्वतता वाढविण्यावर या संस्थेचा विशेष भर असून नवीन ऊस जाती विकसित करणे, कीड व रोग व्यवस्थापन, आधुनिक शेती तंत्रज्ञान, स्मार्ट शेती आणि शाश्वत कृषी पद्धती यामध्ये ही संस्था आघाडीवर आहे.
या भेटीदरम्यान ऊस पिकाची उत्पादकता आणि साखर उतारा वाढविणे, स्पीड ब्रीडिंगसारख्या अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर, हवामान बदलास प्रतिकार करणाऱ्या ऊस जातींचा विकास, कीड व रोग व्यवस्थापनातील आधुनिक उपाययोजना तसेच मिलिंग आणि प्रोसेसिंग तंत्रज्ञानातील सुधारणा या विषयांवर सखोल चर्चा होणार आहे.
विशेष म्हणजे, ऑस्ट्रेलियामध्ये ऊस संशोधनासाठी आधुनिक प्रयोगशाळा, संशोधन केंद्रे आणि शेतस्तरीय प्रयोग यांचा प्रभावी समन्वय केला जातो. संशोधन थेट शेतकऱ्यांपर्यंत पोहोचविण्याची ही यंत्रणा महाराष्ट्रासाठीही आदर्श ठरू शकते, असे तज्ज्ञांचे मत आहे.
या दौऱ्याचे आणखी एक महत्त्वाचे वैशिष्ट्य म्हणजे वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूट आणि शुगर रिसर्च ऑस्ट्रेलिया यांच्यात सामंजस्य करार (MoU) होण्याची शक्यता आहे. हा करार झाल्यास संयुक्त संशोधन प्रकल्प, तंत्रज्ञान देवाणघेवाण, शास्त्रज्ञांचे प्रशिक्षण आणि सुधारित ऊस वाणांच्या विकासासाठी मोठा मार्ग मोकळा होणार आहे.
तज्ज्ञांच्या मते, या सहकार्यामुळे महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना अधिक उत्पादनक्षम, रोगप्रतिकारक आणि हवामान बदलास तोंड देणाऱ्या ऊस जाती उपलब्ध होतील. त्याचबरोबर साखर उद्योगाला जागतिक स्पर्धेत सक्षमपणे टिकून राहण्यासाठी मदत मिळेल. शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढणे, साखर कारखान्यांची कार्यक्षमता सुधारणे आणि उद्योगाची टिकावधारकता मजबूत करणे या दृष्टीने हा दौरा अत्यंत महत्त्वाचा मानला जात आहे.
हा ऑस्ट्रेलिया अभ्यासदौरा महाराष्ट्रातील ऊस शेती आणि साखर उद्योगासाठी परिवर्तनकारी ठरण्याची शक्यता असून “जागतिक ज्ञान; स्थानिक विकास” या संकल्पनेला नव्या उंचीवर नेणारा ठरणार आहे.
शेवटी बोलताना बाळासाहेब थोरात म्हणाले की, जगभरात साखर उद्योगात नवे तंत्रज्ञान आलेले आहे, नवीन संशोधन झालेले आहे, त्याचा फायदा महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना होणे आवश्यक आहे, शुगर रिसर्च ऑस्ट्रेलिया या संस्थेसोबत त्यासंदर्भातील वाटाघाटी करणे हा या दौऱ्याचा उद्देश आहे.
