Marathi e-Batmya

अरविंद केजरीवालांचे आता हिंदू कार्ड: नोटेवर लक्ष्मी आणि गणपतीचा फोटो छापा

नवी दिल्ली पाठोपाठ पंजाबमधील विधानसभा निवडणूकीत डॉ बाबासाहेब आंबेडकर आणि भगतसिंग यांच्या विचारानुसार वाटचाल करणार असल्याची ग्वाही देत सत्ता काबीज केली. मात्र आता आगामी गुजरात आणि हिमाचल प्रदेशातील विधानसभा निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर आम आदमी पार्टीचे प्रमुख तथा दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी रिझर्व्ह बँकेच्या नोटेवर गांधींच्या फोटोसोबतच लक्ष्मी आणि गणपती या देवतांचे फोटो छापावेत अशी मागणी केंद्र सरकारकडे आज केली.

आज बुधवारी सकाळी अरविंद केजरीवाल यांनी पत्रकार परिषद घेत आपल्या ट्विट हॅडलवर एक व्हिडिओ जारी करत वरील मागणी केली.

अर्थव्यवस्था बळकट करण्यासाठी आणि देशाला विकसित करण्यासाठी आपल्याला देवी-देवतांचे आशीर्वाद हवेत असं सांगत त्यांनी ही मागणी केली. नोटांवर महात्मा गांधींचा फोटो तसाच ठेवत दुसऱ्या बाजूला लक्ष्मी आणि गणपतीचा फोटो छापला पाहिजे अशी मागणी करत यासंबंधी ते पंतप्रधान नरेंद्र मोदींना पत्रही लिहिणार असल्याचे त्यांनी सांगितले.

दिवाळीच्या रात्री पूजा करताना आपल्या मनात हा विचार आला. यासंदर्भात अनेक लोकांशी आपली याबाबत चर्चा झाली असून, कोणीही त्यावर आक्षेप घेण्याचं कारण नाही. डॉलरच्या तुलनेत रुपया घसरत असल्याचा उल्लेख करताना केजरीवाल यांनी देवी-देवतांचा आशीर्वाद असेल तरच प्रयत्नांना यश मिळतं सांगत हा सल्ला त्यांनी दिला.

भारत एक श्रीमंत देश व्हावा आणि प्रत्येक भारतीय कुटुंब श्रीमंत व्हावं अशी सर्वांची इच्छा आहे. यासाठी अनेक पावलं उचलण्याची गरज आहे. आपल्याला मोठ्या संख्येने शाळा, रुग्णालयं हवी आहेत. पायाभूत सुविधा निर्माण करायच्या आहेत. पण देवी-देवतांचा आशीर्वाद असेल तेव्हाच याचा प्रयत्नांना यश मिळेल. अनेकदा प्रयत्न करुनही आपल्याला यश मिळत नाही. तेव्हा देवी-देवतांचा आशीर्वाद असेल तर परिणाम दिसतील असं वाटत असतं असेही ते म्हणाले.

परवा दिवाळी होती. आपण सर्वांनी गणपती आणि लक्ष्मीची पूजा केली. सुख आणि शांतीसाठी प्रार्थना केली. व्यापारी तसंच इतर सर्वजण लक्ष्मी आणि गणपतीची मूर्ती ठेवत असल्याचं आपण पाहतो. रोज सकाळी काम सुरु करण्याआधी त्यांची पूजा करतात. आज माझं केंद्र सरकार आणि पंतप्रधानांना आवाहन आहे की, भारतीय चलनावर गांधींजींचा फोटो आहे तो तसाच ठेवत दुसऱ्या बाजूला गणपती आणि देवी लक्ष्मीचा फोटो लावला जावा. जसं मी म्हटलं की, अर्थव्यवस्था बळकट करण्यासाठी आपल्याला खूप प्रयत्न करण्याची गरज आहे. पण सोबतच देवी-देवतांचे आशीर्वादही हवे आहेत असेही त्यांनी सांगितले.

जर भारतीय चलनावर एका बाजूला गांधी आणि दुसऱ्या बाजूला लक्ष्मी, गणपतीचा फोटो असेल तर संपूर्ण देशाला त्यांचा आशीर्वाद मिळेल, असा विश्वासही त्यांनी यावेळी व्यक्त केला.

केजरीवालांनी यावेळी इंडोनेशियाचंही उदाहरण देत म्हणाले, सर्व नव्या नोटा बदला असं आमचं म्हणणं नाही. पण नव्या नोटांवर हे फोटो छापत सुरुवात करु शकतो. इंडोनेशियात ८५ टक्के मुस्लीम आणि दोन टक्के हिंदू लोकसंख्या आहे. मात्र तरीही त्यांनी नोटेवर गणपतीचा फोटो छापला. मी देशातील १३० कोटी जनतेच्या वतीने पंतप्रधान नरेंद्र मोदींना आवाहन करत अससल्याचेही ते म्हणाले.

 

Exit mobile version