Marathi e-Batmya

कालच्या राड्यानंतर स्टॅड अप कॉमेडियन कुणाल कामरा याचं आणखी एक नवं गीत

राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर आधारीत ठाणे की रिक्षा, चेहरे पे दाढी आखोंपे चष्मा हे गाणं काल स्टॅड अप कॉमेडियन कुणाल कामरा यांनी रिलिज केलं. त्यानंतर एकनाथ शिंदे यांच्या शिवसेना पक्षाच्या कार्यकर्त्यांनी संबधित रेकॉर्डिंग स्टुडिओवर हल्ला करत मोठ्या प्रमाणावर नासधुस आणि तोडफोड केली. या राड्यानंतर कुणाल कामरा यांनी आणखी एक गाणं आज प्रसारित केले. विशेष म्हणजे या गाण्याच्या समर्थनार्थ अनेक कमेंट्सही नेटकऱ्यांनी केल्या आहेत.

दोनच दिवसापूर्वी स्टॅड अप कॉमेडियन कुणाल कामरा यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे खिल्ली उडविणारे गाणं त्याने त्यांच्या एका शोमध्ये गाऊन दाखवले. त्यानंतर ते गाण तुफान व्हायरल झाले. त्यावरून शिंदे शिवसेनेचे कार्यकर्ते आक्रमक होत ज्या हॉटेल वजा स्टुडिओत हा शो रेकॉर्ड करण्यात आला होता, त्यावर हल्ला करत नासधुस आणि तोडफोड केली. तसेच कुणाल कामरा यांच्या विरोधात गुन्हाही दाखल करण्याचा इशारा दिला होता. त्यानुसार त्या गाण्यावरून कुणाल कामरा यांच्या विरोधात कारवाई करण्याचे निर्देश मुख्यमंत्री फडणवीस यांनी पोलिस यंत्रणेला दिले. त्यानुसार खार पोलिस स्टेशनला गुन्हाही दाखल करण्यात आला.

विरोधकांनी अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा मुद्दा करत कुणाल कामरा यांच्या गाण्याचं कौतुक केलं. तर ती अभिव्यक्ती स्वातंत्र्यांची गळचेपी असल्याचा प्रत्यारोप सत्ताधारी वर्गाकडून करण्यात आला. तसेच मुख्यमंत्री फडणवीस यांच्या आदेशानुसार कुणाल कामरा यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. परंतु कुणाल कामरा याने यावर शांत न राहता काल रात्रीच भली मोठी पोस्ट लिहित गाण्याबद्दल माफी मागणार नसल्याचे जाहिर केले. तसेच कालच्या राड्याच्या पार्श्वभूमीवर आणखी एक नवं गाणंही पुन्हा सादर केलं. त्यामध्ये राहुल कनाल यांना लक्ष्य केल्याचे दिसून आले.

तसेच कुणाल कामरा याने या नव्या गीतात विकसित भारताचं आणखी एक राष्ट्रगीत असल्याचं सांगत हम होंगे कामयाब या गाण्याचे विडंबन करत हम होंगे कंगाल हे गाणं तयार केले आहे. काल दिवसभरात राडा झाला, त्याच्या काही क्लिप्सही या गाण्यात समाविष्ट करण्यात आल्या आहेत. त्यामुळे या गाण्यावर एकनाथ शिंदे यांची शिवसेना काय प्रतिक्रिया देते हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.

Exit mobile version