Marathi e-Batmya

अखेर सत्तारांच्या वक्तव्यावर सुप्रिया सुळे म्हणाल्या, सगळेच तारतम्य पाळतात असे नाही..

शिंदे-फडणवीस सरकारमधील कृषी मंत्री अब्दुल सत्तार यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या आणि खासदार सुप्रिया सुळे यांच्याबाबत आक्षेपार्ह विधान केले. त्यानंतर महाविकास आघाडीच्या नेत्यांसह राज्यभरातून यासंदर्भात प्रतिक्रिया उमटली. त्याचबरोबर भाजपाने  याप्रश्नी नापसंती दर्शविली. या सगळ्या पार्श्वभूमीवर खासदार सुप्रिया सुळे यांनी यावर ट्विटद्वारे भाष्य करत सगळेच तारत्मय पाळतात असे नाही असे सांगत आता या वक्तव्यावरून संपूर्ण महाराष्ट्रातून प्रतिक्रिया व्यक्त झाल्याने आता याच्या खोलात अधिक जाण्याची गरज नसल्याचे सांगत या वादावर पडदा टाकला.

सुप्रिया सुळेंनी त्यांच्या ट्विटर अकाऊंटवर यासंदर्भात आपली भूमिका स्पष्ट करताना म्हणाल्या की, सत्तेच्या केंद्रस्थानी बसलेल्यांकडून अशी वक्तव्ये अपेक्षित नसतात. तसेच, महाराष्ट्राची सुसंस्कृत परंपरा जतन करण्याचं आवाहनही त्यांनी लोकांना केलं.

महाराष्ट्राच्या एका मंत्र्याकडून काही अपशब्द वापरले गेले, याची प्रतिक्रिया संपूर्ण महाराष्ट्रात उमटली. कारण अशा प्रकारची वक्तव्ये ही महाराष्ट्राची संस्कृती नाही. असं बोलणं-वागणं ही आपली परंपरा नाही. अशा प्रकारची वक्तव्ये सत्तेच्या केंद्रस्थानी बसलेल्या लोकांकडून अपेक्षित नसतात, असं त्या म्हणाल्या.

सगळेच तारतम्य पाळतात असे नाही. पण जरी त्यांनी काही तारतम्य पाळले नाही तरी ज्या पद्धतीने विविध संस्था, व्यक्ती, माध्यमातून याबाबत प्रतिक्रिया आल्या, संवेदना व्यक्त केल्या गेल्या, ही बाब आश्वासक आहे. तिची नोंद घेणे गरजेचे आहे, असा सत्तार यांना टोला लगावत सावध प्रतिक्रिया व्यक्त केली.

महिलांचाच सन्मान जपण्याची महाराष्ट्राची सुसंस्कृत परंपरा जतन करण्याचं आवाहनही सुप्रिया सुळेंनी केलं आहे. मला आवर्जून असे सांगायचे आहे की, जर कुणी चुकीचे बोलले असेल, त्यांनी महिलांचा सन्मान जपला नसेल म्हणून आपण अस्वस्थ होणं स्वाभाविक असलं तरी आपण या सगळ्या प्रवृत्ती बाजूला टाकूयात आणि महाराष्ट्राची जी सुसंस्कृत परंपरा आहे, ती जतन करुया असेही त्या म्हणाल्या.

राज्यातील विविध क्षेत्रातील कार्यकर्त्यांनी, जाणकारांनी समंजसपणाची भूमिका दाखवून हा ‘सुसंस्कृत महाराष्ट्र’आहे हे पुन्हा एकदा अधोरेखित केले याबद्दल मी मनःपूर्वक कृतज्ञता व्यक्त करते. धन्यवाद. जय हिंद-जय महाराष्ट्र!” असे त्या शेवटी म्हणाल्या.

Exit mobile version