Marathi e-Batmya

अजित पवार म्हणाले, भारतीय सैन्यदलांच्या क्षमतेवर देशाला संपूर्ण विश्वास

भारताने दहशतवादाविरुद्ध कणखर भूमिका घेत पहलगाममधील हल्ल्याला चोख प्रत्युत्तर म्हणून आज पहाटे ‘ऑपरेशन सिंदूर’ राबवत पाकिस्तान व पाकव्याप्त काश्मीरमधील दहशतवादी तळांवर हल्ले करून नष्ट केल्याबद्दल उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी भारतीय सैन्यदलांचे आणि ‘ऑपरेशन सिंदूर’मध्ये सहभागी झालेल्या सैनिकांचे अभिनंदन केले आहे. तसेच भारतीय सैनिकांच्या क्षमतेवर देशाला पूर्ण विश्वास असून संपूर्ण देश एकजुटीने त्यांच्यामागे उभा आहे, अशा शब्दात उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी या कारवाईचे समर्थन आणि कौतुक केले.

उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले की, पाकिस्तानपुरस्कृत दहशतवाद आता सहन केला जाणार नाही, हे ‘ऑपरेशन सिंदूर’ने पुन्हा सिद्ध केले आहे. पहलगाम येथे २२ एप्रिल रोजी झालेल्या दहशतवादी हल्ल्यात २६ निष्पाप पर्यटकांचा बळी गेला होता. या हल्ल्याने संपूर्ण देश संतप्त होता. या हल्ल्याची जबाबदारी लश्कर-ए-तैयबा आणि जैश-ए-मोहम्मद या दहशतवादी संघटनांनी घेतली होती. याला प्रत्युत्तर म्हणून भारताने आज भल्या पहाटे ‘ऑपरेशन सिंदूर’च्या माध्यमातून नियोजनबद्ध, अचूक हल्ले करत दहशतवाद्यांचे कंबरडे मोडले. या कारवाईत नऊ दहशतवादी तळ नष्ट करण्यात आल्याची माहिती आहे. पाकिस्तानपुरस्कृत दहशतवाद संपूर्ण संपेपर्यंत अशाच पद्धतीने कारवाई होत राहील, हा संदेश देण्यात आपण यशस्वी ठरलो आहोत, असे सांगत भारतीय वायुसेना, नौसेना आणि थलसेनेच्या नेतृत्वाचे आणि सैनिकांचे अभिनंदन केले.

शेवटी बोलताना अजित पवार म्हणाले की, देशाच्या सीमेपलिकडे जावून लष्करी कारवाई करण्यासाठी राजकीय इच्छाशक्ती महत्वाची असते. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या साहसी, कणखर नेतृत्वानं ती नेहमीच इच्छाशक्ती दाखवली आहे. भारतीय सैन्यदलांना संपूर्ण स्वातंत्र्य, मोकळीक, ताकद देत त्यांच्यामागे भक्कमपणे उभं राहिल्याबद्दल पंतप्रधानमंत्री नरेंद्र मोदी, गृहमंत्री अमित शहा, संरक्षणमंत्री राजनाथसिंह यांचेही उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी  अभिनंदन केले आहे. सैन्यदलांची ताकद, राजकीय इच्छाशक्ती, देशवासियांच्या एकजुटीतून ‘ऑपरेशन सिंदूर’ यशस्वी झाल्याचे सांगत दहशतवाद संपेपर्यंत अशीच कारवाई होत राहील, असा विश्वासहीही यावेळी व्यक्त केला.

Exit mobile version