Marathi e-Batmya

अजित पवार यांचा धर्मनिरपेक्षतेचा नारा, तर खासदार सुनेत्रा पवार रा.स्व.संघाच्या कार्यक्रमाला हजेरी

साधारणतः काही महिन्यांपूर्वी झालेल्या विधानसभा आणि लोकसभा निवडणूकीत आणि त्यानंतर अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसकडून सातत्याने आमची विचारधारा फुले-शाहू-आंबेडकरांची विचारधारा असून आम्ही धर्मनिरपेक्षतेचे राजकारण करत असल्याचा दावा उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पक्षाच्या व्यासपीठावरून सातत्याने मांडली. परंतु त्यांच्याच पत्नी खासदार सुनेत्रा पवार यांनी संसद अधिवेशनाच्या निमित्ताने दिल्लीत असून त्यांनी चक्क राष्ट्रीय स्वंयसेवक संघाच्या कार्यक्रमाला हजेरी लावत आपण पक्षाच्या धोरणाच्या विरोधात असल्याचे दाखवून दिले. त्यामुळे अजित पवार यांची भूमिका नक्की धर्मनिरपेक्षतेची की हिंदूत्वाची यावरून प्रश्न उपस्थित होत आहे. यासंदर्भात अजित पवार यांना यासंदर्भात प्रसार माध्यमांच्या प्रतिनिधीनी सवाल उपस्थित करताच त्यांच्यासमोर हात जोडले.

सध्या दिल्लीत संसदेचे पावसाळी अधिवेशन सुरु आहे. या अधिवेशनासाठी खासदार सुनेत्रा पवार या दिल्लीत आहेत. परंतु राष्ट्रीय स्वंयसेवक संघाच्या एका कार्यक्रमाला खासदार सुनेत्रा पवार यांनी उपस्थिती लावली. त्यामुळे सर्वांच्याच भुवया उंचावल्या आहे. समजलेल्या माहितीनुसार राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या महिला शाखेच्या ‘राष्ट्र सेविका समिती’ चा कार्यक्रम दिल्लीत अभिनेत्री तथा भाजपाच्या खासदार कंगना राणौत यांच्या घरी आयोजित करण्यात आला होता. त्या कार्यक्रमाला सुनेत्रा पवार यांनी खास हजेरी लावली. त्यामुळे राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले आहे. विशेष म्हणजे, अभिनेत्री आणि भाजपाच्या खासदार कंगना राणौत यांनी ही माहिती दिली.

खासदार सुनेत्रा पवार यांनी या कार्यक्रमाला उपस्थिती लावल्याबाबत अजित पवारांना विचारले असता, माझी बायको सकाळपासून संध्याकाळपर्यंत कुठे जाते, त्याची मिनिट-टू-मिनिट माहिती मला नसते, असे म्हणत पत्रकारांसमोर हात जोडले.

अजित पवार यांनी नागपूर येथील रेशीमबागेत जाणे टाळले होते. मात्र, आता त्यांच्या पत्नी आणि खासदार सुनेत्रा पवार यांनी राष्ट्रसेविका समितीच्या बैठकीला हजेरी लावल्याने मोठी चर्चा रंगली आहे. कंगणा राणौत यांच्या निवासस्थानी या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. याबाबत त्यांनी सोशल मीडिया फोटो शेअर माहिती दिली. या फोटोंमध्ये संघाच्या कार्यक्रमात सुनेत्रा पवार दिसल्याने अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत.

अजित पवार आज वर्धा जिल्ह्याच्या दौऱ्यावर आहेत. यावेळी पत्रकार परिषदेत पत्रकारांनी त्यांना सुनेत्रा पवार यांच्या राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या कार्यक्रमातील उपस्थितीबद्दल प्रश्न विचारला होता. यावर अजित पवार यांनी थोडे रागातच उत्तर देत, पत्रकारांसमोर हात जोडले. प्रश्न विचारणे हा पत्रकारांचा अधिकार आहे. पण कोणते प्रश्न विचारावे याचा विचार करावा असे ते म्हणाले. पत्रकारांनी वर्धा जिल्ह्याच्या विकासासंदर्भातील प्रश्न विचारावे अशी अपेक्षा व्यक्त केली.

अजित पवार म्हणाले, मी विचारतो, मला माहित नाही. माझी बायको सकाळपासून संध्याकाळपर्यंत कुठे कुठे जाते हे मला मिनीट टू मिनीट माहिती नसतं. आपण आत्ताच विचारलेलं आहे. मी आता विचारतो, का गं, कुठे गेली होती? असं खोचक उत्तर अजित पवार यांनी प्रसारमाध्यमांच्या प्रतिनिधींना देत स्वतःची सुटका करून घेण्याचा प्रयत्न केला.

पुढे बोलताना अजित पवारांनी पत्रकारांसमोर हात जोडत, काय खरंच ना… असे म्हटले. नंतर कपाळाला हात लावत, तुमचा अधिकार आहे. मात्र काय आपण प्रश्न विचारावेत. अजित पवार वर्ध्यात आला आहे. आपल्या वर्ध्याच्या विकासाच्या दृष्टीने काय विचारता येईल ते सोडून दिले. कुठे अजित पवार काय म्हणेल, कुठे ब्रेकिंग न्यूज देता येईल. मग अजित पवार काय म्हणाला दाखवतील. मग तुमचे काय म्हणणे म्हणत समोरच्यांचे दाखवतील. काय चाललंय? असा सवालही यावेळी.

या पार्श्वभूमीवर सुनेत्रा पवार यांनी आपले स्पष्टीकरण दिले की. या कार्यक्रमात मला स्नेहमिलनासाठी बोलावल होते. त्यामुळे मी तिथे गेले. तिथे संघाच्या अनुषंगाने कार्यक्रम होता, याची मला कल्पना नव्हती, असे स्पष्टीकरण दिले.

दरम्यान कंगना राणौत यांनी सोशल मीडियावर फोटो पोस्ट करत, निवासस्थानी आयोजित महिला शाखेच्या कार्यक्रमाबद्दल माहिती दिली. त्यांनी लिहिले, ‘आज माझ्या निवासस्थानी ‘राष्ट्र सेविका समिती’ महिला शाखेचे आयोजन करण्यात आले. आपण एकत्रितपणे सनातन मूल्ये, हिंदू संस्कृती आणि राष्ट्रीय जाणीवेला अधिक प्रखर बनवुयात. मानवसेवा, राष्ट्र निर्माण आणि सनातन संस्कृतीच्या संरक्षणासाठी निरंतर कार्य करत राहण्याचा आम्हा सर्वांचा संकल्प आहे. महिलांची जागरुकता आणि त्यांचा सहभागच राष्ट्राला सशक्त बनवतो,’

ही अजित पवारांच्या पक्षाची दुटप्पी भूमिका – रोहित पवार

या घटनेवर राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार रोहित पवार म्हणाले की, जेव्हा ओबीसी आरक्षण दिले गेले होते तेव्हा कमंडल यात्रा काय होती, हे आरएसएसच्या प्रमुखांना त्यांनी विचारले पाहिजे. सत्तेत ते गेलेत त्याची कारणे वेगळी आहेत. पण तिथे गेल्यानंतर त्यांचे विचार काही त्यांनी स्वीकारले नसतील पण, कुठेतरी त्यांच्यावर प्रेशर असेल की एखाद्या बैठकीला या, एखादा फोटो येऊद्या… म्हणजे हे आरएसएसचा विचार स्वीकारत असल्याचा संदेश जातो. एकाबाजूला तुम्ही पुरोगामी विचार म्हणता, एकाबाजूला चव्हाण साहेबांचं, शिव-शाहू-फुले- आंबेडकरांचे नाव घेता आणि दुसरीकडे आरएसएसच्या बैठकीला तुमचे प्रतिनिधी जात असतील, तर ही दुटप्पी भूमिका आहे आणि आज राजकारणात लोकांना दुटप्पी भूमिका नकोय अशी टीकाही यावेळी केली.

Exit mobile version