Marathi e-Batmya

आकाश फुंडकर यांची माहिती, श्रम शिक्षण, संशोधन आणि कौशल्य विकासाला नवी दिशा मिळणार

नागपूर येथील राष्ट्रसंत तुकडोजी महाराज विद्यापीठ आणि नारायण मेघाजी लोखंडे महाराष्ट्र श्रम विज्ञान संस्था यांच्यात कामगार मंत्री ॲड. आकाश फुंडकर यांच्या प्रमुख उपस्थितीत मंत्रालयात सामंजस्य करारावर स्वाक्षऱ्या करण्यात आल्या. राज्यातील श्रम शिक्षण, संशोधन, कौशल्य विकास आणि उद्योगाभिमुख मनुष्यबळ निर्मितीला या करारामुळे नवी गती मिळेल, असा विश्वास कामगार मंत्री ॲड. फुंडकर यांनी यावेळी व्यक्त केला.

या कराराच्या माध्यमातून श्रमविषयक शिक्षण अधिक व्यावहारिक आणि कौशल्याधारित करण्यासह अल्पकालीन प्रमाणपत्र व पदविका अभ्यासक्रम सुरू करण्यात येणार आहेत. उद्योग क्षेत्राच्या बदलत्या गरजांनुसार अभ्यासक्रम विकसित करून विद्यार्थी, कर्मचारी, मानव संसाधन व्यवस्थापन क्षेत्रातील व्यावसायिक तसेच कामगार क्षेत्राशी संबंधित घटकांना दर्जेदार प्रशिक्षण उपलब्ध करून देण्यास यामुळे मदत होईल, असा विश्वास कामगार मंत्री ॲड. फुंडकर यांनी यावेळी व्यक्त केला.

कामगार मंत्री ॲड. आकाश फुंडकर म्हणाले, दोन्ही संस्थांच्या संयुक्त विद्यमाने प्राध्यापकांची देवाणघेवाण, अभ्यासक्रमांचे अद्ययावतीकरण, संयुक्त संशोधन, कार्यशाळा, परिसंवाद, जनजागृती कार्यक्रम आणि विस्तार उपक्रम प्राधान्याने राबविण्यात यावेत. श्रम कल्याण, सामाजिक सुरक्षा, औद्योगिक संबंध, मानव संसाधन विकास आणि रोजगारक्षम कौशल्य निर्मिती या क्षेत्रांमध्ये संशोधनाला चालना देत उद्योग व शिक्षण यांच्यातील दुवा अधिक मजबूत करण्याचे उद्दिष्ट या करारातून साध्य होईल, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.

पुढे बोलताना ॲड. आकाश फुंडकर म्हणाले की, हा सामंजस्य करार तीन वर्षांसाठी लागू राहणार असून परस्पर संमतीने त्याचा कालावधी वाढविण्याची तरतूद करण्यात आली आहे. या उपक्रमामुळे राज्यातील श्रम क्षेत्रात संशोधन, कौशल्य विकास, रोजगाराभिमुख शिक्षण आणि उद्योग-संलग्न प्रशिक्षणाला नवी दिशा मिळेल, असा विश्वास यावेळी व्यक्त केला.

या करारानुसार विद्यापीठ अभ्यासक्रमांना शैक्षणिक मान्यता, गुणवत्ता नियंत्रण, अभ्यासक्रम मंजुरी आणि यशस्वी विद्यार्थ्यांना प्रमाणपत्र प्रदान करेल. महाराष्ट्र श्रम विज्ञान संस्था अभ्यासक्रमांची अंमलबजावणी, प्रशिक्षण, आवश्यक पायाभूत सुविधा आणि शैक्षणिक व्यवस्थापनाची जबाबदारी पार पाडणार आहे. संयुक्त देखरेख समितीच्या माध्यमातून अभ्यासक्रमांच्या गुणवत्तेचा नियमित आढावा घेण्यात येणार आहे. संशोधनातून निर्माण होणाऱ्या बौद्धिक संपदा हक्कांबाबतही दोन्ही संस्था संयुक्तपणे कार्य करतील, अशी माहिती यावेळी देण्यात आली.

यावेळी नागपूर येथील राष्ट्रसंत तुकडोजी महाराज विद्यापीठाच्या कुलगुरू डॉ. मनाली क्षीरसागर, आजीवन शिक्षण व विस्तार विभागाचे संचालक डॉ. सुमित माहोरे, नारायण मेघाजी लोखंडे महाराष्ट्र श्रम विज्ञान संस्थेच्या संचालिका तथा कामगार विभागाच्या उपसचिव रोशनी कदम पाटील, उपसचिव स्वप्नील कापडणीस, उपसंचालक डॉ. अतुल नऊबदे तसेच दोन्ही संस्थांचे अधिकारी उपस्थित होते.

Exit mobile version