Marathi e-Batmya

परमबीर सिंगाच्या अनेक भुमिका संशयास्पद असल्यानेच बदली

मुंबई : प्रतिनिधी

रोज वर्तमान पत्रात आणि टिव्ही चँनलमधुन परमबीर सिंग यांच्या विरोधात भ्रष्टाचाराचे नवनवीन आरोप आता समोर येत आहे. मुकेश अंबानी यांच्या घरासमोर जिलेटीन ठेवण्याचे प्रकरण व मनसुख हिरेन हत्या प्रकरणात सचिन वझे व मुंबईचे माजी पोलिस आयुक्त परमबीर सिंग यांची भुमिका संशयास्पद असल्याच्या अनेक गोष्टी समोर आल्या आहेत. सचिन वझे व परमबीर सिंग यांच्या गंभीर चुका होत्या आणि त्या माफ करण्यालायक नव्हत्या असा गंभीर आरोप माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांनी पुन्हा एकदा आज एका प्रसिध्दी पत्रकान्वये केला.

त्या प्रकरणाचा तपास NIA करीत आहे. म्हणुन मी त्यांची मुंबई आयुक्त पदावरुन बदली केली होती. तसेच एका कार्यक्रमात या संदर्भातचे मी जाहीर वक्तव्य सुध्दा केले होते. त्याच्या रागापोटी त्यांची बदली केल्यानंतर सिंग यांनी माझ्यावर खोटे आरोप केले. ३० वर्षाच्या राजकीय जीवनात माझ्यावर एक सुध्दा आरोप नाही. परमबीर सिंग यांच्या खोटया आरोपावरुन माझ्यावर जो CBI ने गुन्हा दाखल केला आहे, त्यावर न्याय मागण्यासाठी मी उच्च न्यायालयात दाद मागितल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले.

मागील काही दिवसात होमगार्डचे प्रमुख आयपीएस अधिकारी परमबीर सिंग यांच्या विरोधात सातत्याने राज्याच्या वेगवेगळ्या भागात गुन्हे दाखल होत आहेत. तसेच सिंग यांनी खोटे गुन्हे दाखल करून खंडणी गोळा केल्याचे प्रकरणही उघडकीस आले आहे. त्या पार्श्वभूमीवर अनिल देशमुख यांनी सीबीआयने गुन्हा दाखल केल्यानंतर पहिल्यांदाच आपली बाजू पत्रकान्वये मांडली आहे. तसेच आपल्यावरील गुन्हा रद्द करण्यात यावा यासाठी उच्च न्यायालयात धाव घेतल्याचेही त्यांनी यावेळी स्पष्ट केले.

Exit mobile version