Marathi e-Batmya

बदलापूरप्रकरणी दीपक केसरकर यांनी दिली माहिती, मुख्याध्यापिकेकडे तक्रार करूनही…

बदलापूर येथील आदर्श शाळेतील दोन चिमुरडींवरील अत्याचाराच्या घटनेमुळे संपूर्ण महाराष्ट्राचे राजकिय आणि सामाजिक वातावरण ढवळून निघाले. त्यातच या प्रकरणातील एक एक धागेधोरे आता पुढे येत असून या प्रकरणी मुख्याधिकेची भूमिका आणि १५ दिवसाचे फुटेज गायब असल्याची धक्कादायक माहिती पुढे आली आहे. यासंदर्भात शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांनी आज पत्रकार परिषदेत बदलापूर प्रकरणी घडलेल्या घटनेची माहिती दिली.

दीपक केसरकर पुढे बोलताना म्हणाले की, वास्तविक पाहता ही घटना घडलीच नसती. मात्र लहान विद्यार्थ्याच्या सेवेसाठी कामावर ठेवण्यात आलेल्या दोन महिला त्या दिवशी कामावरच आल्या नाहीत. त्यामुळे या दोन सेविकांना सहआरोपी करण्याची शिफारस याप्रकरणी राज्य सरकारने नेमलेल्या समितीने केली आहे. त्यामुळे तशी शिफारस आम्ही केली आहे.

पुढे बोलताना दीपक केसरकर म्हणाले की, वास्तविक पाहता या घटनेत शाळेतील वर्गशिक्षिका, मुख्याध्यापिका आणि संस्थेतील पदाधिकारी जबाबदार असल्याचे दिसून येत आहे. सदर घटना घडल्यानंतर त्या चिमुरडींच्या शाळेतील वर्गशिक्षिका वृषाली देशपांडे यांच्याकडे मुलीच्या आजी आजोबांनी तक्रार केली. मात्र वर्गशिक्षिकेने यासंदर्भात पोलिसांना कळविलं नाही. १४ ऑगस्ट रोजी मुख्याध्यापिका अर्चना आठवले यांच्याकडेही तक्रार दाखल केली. मात्र त्यांनीही

यासंदर्भात पोलिसांना कळविलं नाही, त्यामुळे त्यांच्यावरही पॉस्को अंतर्गत कारवाई करण्याची शिफारस केल्याचंही यावेळी सांगितले.

तसेच मंत्री दीपक केसरकर म्हणाले की, शाळांमध्ये सीसीटीव्ही असणं आवश्यक आहे. मात्र संबधित शाळेतील १५ दिवसांच फुटेज गायब आहे. हे फुटेज का गायब झालं याबाबत पोलिसांकडून चौकशी करावी अशी शिफारस करण्यात आली असून मुलींवरील अत्याचाराची घटना शौचालयाजवळ घडली नेमकं तिथलं फुटेज गायब असल्याचंही सांगितले.

यावेळी दीपक केसरकर म्हणाले की, पीडीत मुलींची आपण लवकरच भेट घेणार असून या दोन्ही मुलींच्या पदवी पर्यंतच्या शिक्षणाची जबाबदारी घेणार असल्याचेही यावेळी आवर्जून सांगितले.

Exit mobile version