Marathi e-Batmya

तुमच्या खुर्च्याही जळतील, त्या फायरप्रुफ नाहीत !

मुंबईः प्रतिनिधी

धुळ्यातील शेतकरी धर्मा पाटील यांच्या आत्महत्त्येच्या मुद्द्यावरून मंगळवारी शिवसेनेच्या मंत्र्यांनी मुख्यमंत्र्यांना धारेवर धरण्याचा प्रयत्न केला खरा पण त्याचाच आधार घेत शिवसेनेच्या मुखपत्रातील अग्रलेखाचा वापर करत वित्तमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी शिवसेनेच्या मंत्र्यांना टोला हाणला. धर्मा पाटील यांच्या चितेने सरकारच्या खुर्च्या जळतील तेव्हा तुमच्याही खुर्च्या जळतील. त्या काही फायरप्रुफ नाहीत, असा टोला वित्तमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी मंगळवारी शिवसेनेच्या मंत्र्यांना लगावल्याचे समजते.

कॅबिनेटची बैठक सुरू होताच उद्योगमंत्री सुभाष देसाई (शिवसेना) यांनी मुख्यमंत्र्यांनाच अडचणीत आणण्याचा प्रयत्न केला. सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार महामुंबई एसईझेड रद्द करून त्या ठिकाणी आयआयए म्हणजेच एकत्रित औद्योगिक क्षेत्र उभारण्याबाबतचा प्रस्ताव आज मंत्रिमंडळ बैठकीत आला होता. नगरविकास विभागाने हा प्रस्ताव आणला होता. मात्र औद्योगिक क्षेत्र उभे राहणार असल्याने उद्योग विभागाला याबाबतची सविस्तर माहिती मिळालया हवी अशी मागणी देसाई यांनी केली. नगरविकास विभागाने महामुंबई एसईझेड रद्द होऊन त्याजागी उभ्या राहणाऱ्या आयआयएमध्ये कोणकोणते उद्योग उभे राहणार आहेत याची माहिती द्यावी असे ते म्हणाले. एरव्ही देसाई यांना साथ देण्यास उत्सुक नसणारे पर्यावरणमंत्री रामदास कदम (शिवसेना) यांनी यावेळी त्यांना साथ दिली आणि हा प्रस्ताव रोखून धरण्याचा प्रयत्न केला. परंतु देसाई यांना आवश्यक ती माहिती दिली जाईल, असे सांगत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी त्याला तत्त्वतः मान्यता देण्याचा निर्णय घेतला.

हा विषय संपतो न संपतो तोच परिवहनमंत्री दिवाकर रावते (शिवसेना) यांनी धर्मा पाटील यांच्या आत्महत्त्येचा विषय काढला. शिवसेनेच्या मुखपत्रातून मंगळवारी पाटील यांच्या चितेमुळे सरकारच्या खुर्च्या जळतील, असे म्हणण्यात आले होते. तो धागा पकडत रावते यांनी हे सरकार गेले तीन वर्षे काय करत होते, असा सवाल केला. सरकारला धारेवर धरण्याचा त्यांचा प्रयत्न पाहता वित्तमंत्री सुधीर मुगंटीवार पुढे सरसावले. सरकारच्या खुर्च्या जळल्या तर त्यात तुमच्याही खुर्च्याही जळतील. त्या काही फायरप्रुफ नाहीत. सरकारमध्ये आहात तर जबाबदारीही घ्या. हे भाजपाशिवसेनेचे सरकार आहे. आपल्या संख्याबळानुसार आपल्याला मंत्रीपदेही दिली आहेत. हे फक्त भाजपाचे सरकार नाही, असे त्यांनी रावते यांना सुनावले, असे कळते.

 

Exit mobile version