Marathi e-Batmya

दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेसचे एकत्रिकरण लांबणीवर

अजित पवार यांच्या अपघाती निधनानंतर दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेसच्या एकत्रिकरणाची चर्चा राज्यात रंगली आहे. शरद पवार यांच्या नेतृत्वातील पक्षाच्या नेत्यांकडून एकत्रिकरणाबाबत अजित पवार यांच्याशी चर्चा झाल्याचे सांगण्यात येत आहे. तर अजित पवार यांच्या पक्षाकडून मात्र अशा चर्चा झाल्या नसल्याचा दावा करण्यात येत आहे. त्यामुळे आता एकत्रिकरणाची चर्चा लांबणीवर पडण्याची शक्यता आहे. मात्र बारामतीत वेगळ्या राजकीय घडामोडी घडताना पाहायला मिळत आहेत.

राष्ट्रवादीचे जेष्ठ नेते शरद पवार यांच्या उपस्थितीत आज विद्या प्रतिष्ठानमध्ये संस्थेची एक बैठक पार पडली. या बैठकीला अजित पवार यांचे पुत्र पार्थ पवार, जय पवार आणि संस्थेचे इतर विश्वस्त उपस्थित होते. मात्र यावेळी शरद पवार यांची पार्थ आणि जय पवारांसह एक स्वतंत्र बैठक झाल्याची माहिती आहे. त्यामुळे विद्या प्रतिष्ठानच्या विश्वस्तांसह घेतलेल्या बैठकीत जरी संस्थेविषयी चर्चा झाली असली तरी त्यावेळी शरद पवार आणि अजित पवारांच्या दोन्ही पुत्रांमध्ये झालेल्या स्वतंत्र बैठकीत राजकीय चर्चा झाली असण्याची दाट शक्यता आहे.

सुनेत्रा पवार उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेणार असल्याचे स्पष्ट होताच शरद पवारांनी आपल्याला शपथविधीबद्दल माहिती नसल्याचे सांगत खळबळ उडवून दिली होती. त्यानंतर तातडीने पार्थ पवार यांनी शरद पवारांच्या निवासस्थानी जाऊन  दोनतास चर्चा केली. या भेटीनंतर पवार कुटुंबातील पुन्हा एकदा संवाद प्रस्थापित झाल्याचे दिसून आले. अजित पवारांचे विश्वासू साथीदार राहिलेल्या किरण गुजर यांनी मोठा खुलासा केला होता. दोन्ही राष्ट्रवादीचं विलीनीकरण ही अजित पवारांची इच्छा होती आणि ती इच्छा पूर्ण करण्याचं काम आता पार्थ पवार यांच्याकडून होणार आहे. पवार कुटुंबातील सर्व सदस्य यासाठी सकारात्मक आहेत, अशी माहिती गुजर यांनी दिली होती. त्यामुळे आज पुन्हा एकदा शरद पवार यांची पार्थ पवार आणि जय पवार यांच्यासोबत बैठक झाल्याने विलीनीकरणाची चर्चा पुढे गेली असण्याची शक्यता आहे.

किरण गुजर नेमकं काय म्हणाले होते?

राज्यातील नेते काहीही म्हणत असतील तरी पवार कुटुंबाने एकत्र येण्याचं ठरवलं आहे, असा दावा किरण गुजर यांनी सुनेत्रा पवारांच्या शपथविधीच्या दिवशीच केला होता. पार्थ पवार यांनी आज शरद पवार यांच्यासह पवार कुटुंबाच्या भेटीत शपथविधी सोहळ्यावरून निर्माण झालेले सर्व समज-गैरसमज दूर केले. तसंच पवार कुटुंबाने आता राजकीदृष्ट्या एकत्र येण्याचा निर्णय घेतला असून मी सहयोग निवासस्थानी पार्थ पवारांची पुन्हा भेट घेत तिथं त्यांच्याबरोबर चर्चा केली. यावेळी अजित पवारांचे राष्ट्रवादीच्या विलीनीकरणाचे स्वप्न कोणत्याही परिस्थितीत साकार करायचं, असं आम्ही ठरवलंय. त्यामुळे दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणारच,असं किरण गुजर म्हणाले होते.

Exit mobile version