Marathi e-Batmya

महात्मा फुले आणि सावित्रीबाई फुले स्मारकाच्या कामावरून छगन भुजबळ यांची नाराजी

राज्याचे माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांनी आज महात्मा फुले वाडा, सावित्रीबाई फुले स्मारक व भिडे वाडा स्मारकाच्या कामाची अधिकाऱ्यांसमवेत पाहणी केली. यावेळी माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांनी क्रांतीसुर्य महात्मा फुले क्रांतीज्योती व सावित्रीबाई फुले यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करत विनम्र अभिवादन केले.

यावेळी ॲड. मंगेश ससाणे, ॲड मृणाल ढोले पाटील, संदीप लडकत, योगेश पिंगळे,मंजिरी धाडगे, प्रितेश गवळी, प्रा.दिवाकर गमे,यश बोरावके,रोहिणी रासकर,अविनाश चौरे,वैष्णवी सातव,सपना माळी, पंढरीनाथ बनकर यांच्यासह महापालिकेचे अधिकारी व पदाधिकारी उपस्थित होते.

छगन भुजबळ म्हणाले की, तत्कालीन राष्ट्रपती शंकर दयाळ शर्मा आणि तत्कालीन मुख्यमंत्री शरद पवार यांच्या उपस्थितीत झालेल्या कार्यक्रमात महात्मा फुले वाडा हा राष्ट्राला अर्पण करण्यात आला. तेव्हापासून याठिकाणी देशभरातील फुले प्रेमी अभिवादन करण्यासाठी येत असतात. याठिकाणी अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषदेच्या वतीने दरवर्षी कार्यक्रमाचे देखील आयोजन करण्यात येत असते. या महात्मा फुले वाड्याच्या नजीकच पुणे महानगरपालिकेने उभारलेले सावित्रीबाई फुले यांचे स्मारक आहे. या दोन्ही स्मारकात अंतर कमी असल्याने या दोन्ही स्मारकात रस्ता तयार करून या स्मारकाचे एकत्रीकरण करण्यात यावे यासाठी अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषदेने मोठा लढा दिला. तसेच सातत्याने शासन दरबारी पाठपुरावा केला.

पुढे बोलताना छगन भुजबळ म्हणाले की, अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषदेच्या या मागणीचा विचार करून राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडून या स्मारक परिसराचे एकत्रीकरण करण्यासाठी आवश्यक भूसंपादन व इतर कामासाठी तातडीने २०० कोटी रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे. यातील शंभर कोटी रुपयांचा निधी मार्च अखेर वितरित करण्यात आला आहे. प्रत्यक्षात पाहणी केली असता अधिकारी वर्गाकडून याठिकाणी कुठलेही काम होताना दिसत नाही. विशेषतः या परिसरातील लोक जागा देण्यासाठी स्वतःहून पुढे येत जागा द्यायला तयार असताना कुठलीही कारवाई होताना दिसत नाही. एकीकडे मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री स्वतः लक्ष घालून तत्परतेने काम करतायत तर दुसरीकडे अधिकारी मात्र काम करताना दिसत नसल्याबाबत नाराजी यावेळी सांगितले.

शेवटी बोलताना छगन भुजबळ म्हणाले की, अधिकाऱ्यांसमवेत पाहणी केल्यानंतर जे लोक स्वतःहून पुढे आले आहेत. त्यांची अधिकाऱ्यांसमवेत भेट घालून दिली. हे सर्व लोक महापालिकेला सहकार्य करत सर्व कागदपत्रे उपलब्ध करून देत आहे. अधिकाऱ्यांनी याबाबत तातडीने लक्ष घालून हा प्रश्न मार्गी लावावा अशा सूचना त्यांना केल्या आहेत. तसेच अधिकाऱ्यांनी देखील एका महिन्याच्या आत भूसंपादनाचा प्रश्न मार्गी लावला जाईल असे सांगितले.

Exit mobile version