Marathi e-Batmya

अजित पवार यांचा मुख्यमंत्र्यांना इशारा, न्यायालयाचा निकाल आमच्या बाजूने…

मागील काही दिवसांपासून महाराष्ट्राच्या विरोधात सातत्याने भूमिका घेणाऱ्या मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांनी काल कर्नाटकात बोलत असताना महाराष्ट्राला एक इंचही जमिन देणार नसल्याची भूमिका जाहिरपणे मांडत महाराष्ट्राच्या विरोधात भूमिका मांडली. त्यावर विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांना इशारा दिला. अजित पवार म्हणाले, सर्वोच्च न्यायालयाच्या निकालाची आपण वाट पहात असून एकदा आमच्या बाजूने निकाल लागू द्या एक इंचही कर्नाटकाला देणार नसल्याचा इशारा दिला.

विधान भवन परिसरात प्रसारमाध्यमांशी अजित पवार हे बोलत होते. त्यावेळी अजित पवार यांनी इशारा दिला.

सर्वोच्च न्यायालयाचा निकाल आमच्या बाजूने लागू द्या एक इंच देखील जमीन तुमच्या भागात जाऊ देणार नाही असा स्पष्ट इशारा विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांना आज दिला.

काल कर्नाटक सरकारचे मुख्यमंत्री बोम्मई एक इंचही जमीन देणार नाही म्हणाले होते. त्यावर आज विरोधी पक्षनेते अजित पवार आक्रमक झाल्याचे पाहायला मिळाले.

माध्यमांशी बोलताना अजित पवार यांनी कर्नाटक सरकारला सीमा प्रश्नावरुन निर्वाणीचा इशाराच यावेळी दिला.
त्याचबरोबर कर्नाटक वेळोवेळी भूमिका घेत असतानाही राज्यातले शिंदे-फडणवीस सरकार मात्र बोटचेपी भूमिका घेत असल्याचा आरोप त्यांनी केला.

तसेच मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री आणि विधानसभा अध्यक्षांना मराठी भाषिक लोकांना आधार देण्यासाठी, मराठी भाषिकांना महाराष्ट्र तुमच्या पाठीशी उभा आहे. सर्वजण तुमच्यासोबत उभे आहोत असे चित्र निर्माण करण्यासाठी दोन्ही सभागृहात ठराव एकमताने मंजूर करायला तयार आहोत. त्यामुळे तो ठराव घ्या अशी विनंती करण्यात आली होती, परंतु आज आठवडा संपतोय तरीही त्यांनी तो ठराव घेतला नसल्याचा आरोप अजित पवार यांनी शिंदे-फडणवीस सरकारवर करत मात्र सोमवारी तो ठराव कोणत्याही परिस्थितीत घेण्यास भाग पाडू असेही ते म्हणाले.

Exit mobile version