मुंबई-नवी दिल्लीः प्रतिनिधी
राज्यातील महाविकास आघाडी सरकारच्या मंत्रिमंडळाचा विस्तार २७ डिसेंबर पूर्वी करण्याचा निर्णय शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसने घेतला आहे. यापैकी राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेनेची यादी जवळपास निश्चित मानली जात असताना काँग्रेसकडून माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण, पुण्याच्या भोर तालुक्यातील संग्राम थोपटे आणि मुंबईतील धारावीच्या आमदार वर्षा गायकवाड यांची नावे निश्चित झाल्याची माहिती काँग्रेसमधील विश्वसनीय सूत्रांनी दिली.
महाविकास आघाडी सरकारच्या मंत्रिमंडळात वर्णी लागावी यासाठी काँग्रेसचे अनेक आमदार प्रयत्नशील आहेत. त्यात माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, अशोक चव्हाण यांच्याकडून मोठ्या प्रमाणावर प्रयत्न करण्यात येत असल्याचे वृत्त सातत्याने चर्चेत होते. या दोन्ही चव्हाणांपैकी अशोक चव्हाण यांच्या नावावर काँग्रेस श्रेष्ठींकडून आणि प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांच्याकडून शिक्कामोर्तब करण्यात आल्याचे त्यांनी सांगितले.
याशिवाय कधी काळी काँग्रेसचा गड असलेल्या पुणे जिल्ह्यात आता भाजपाचे वर्चस्व वाढले आहे. पुण्यात भाजपा आणि काही प्रमाणात राष्ट्रवादीला शह देण्याकरीता माजी मंत्री आणि शरद पवार यांचे कट्टर विरोधक अनंतराव थोपटे यांचे चिंरजीव संग्राम थोपटे यांच्या नावावरही शिक्कामोर्तब करण्यात आले आहे. मुंबईतून धारावीच्या आमदार वर्षा गायकवाड यांनी गुजरात निवडणूकीत चांगले काम केले. तसेच त्या राहुल गांधी यांच्या यंग ब्रिगेडमध्ये स्वतःचे स्थान निर्माण केलेले असल्याने त्यांच्याही नावास पक्षश्रेष्ठींनी मान्यता दिल्याचे त्यांनी सांगितले.
याशिवाय माजी विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार, यशोमती ठाकूर, अमिन पटेल आदी आमदारही मंत्रीपदी वर्णी लागावी यासाठी प्रयत्न करत आहेत. यापैकी विजय वडेट्टीवार आणि अमिन पटेल यांचे नाव निश्चित होण्याची शक्यता असल्याचे त्यांनी शेवटी सांगितले.
काँग्रेसकडून चव्हाण, थोपटे आणि गायकवाड यांची नावे निश्चित
