Marathi e-Batmya

काँग्रेसच्या राज्यसभेची माळ कोणाच्या गळ्यात ?

मुंबई : प्रतिनिधी

राज्यसभेच्या ६ जागांकरीता निवडणूक होत असून या निवडणूकीत महाराष्ट्रातून काँग्रेसकडून तीन नावे अंतिम करण्यात आलेली आहेत. या तीन नावांमध्ये काँग्रेसचे प्रवक्ते रत्नाकर महाजन, माजी केंद्रीय मंत्री राजीव शुक्ला आणि सुशिलकुमार शिंदे यांच्या नावाचा समावेश आहे. मात्र यातील कोणाच्या गळ्यात खासदारकीची माळ पडणार याचा निर्णय दिल्लीत पक्षाचे अध्यक्ष राहुल गांधी हे घेणार असल्याची माहिती काँग्रेसमधील विश्वसनीय सूत्रांनी दिली.

माजी केंद्रीय मंत्री राजीव शुक्ला हे काही दिवसांपूर्वी मुंबईत येवून काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांची भेट घेतली. तसेच त्यांच्यासोबत तासभर चर्चा केली. त्या दरम्यानच उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी लागणारी आवश्यक ती कागदपत्रे त्यांनी मुंबईतच बनवून घेतली असल्याचे त्यांनी सांगितले.

याशिवाय राज्याचे माजी मुख्यमंत्री तथा माजी केंद्रीय गृहमंत्री पद भूषविलेले सुशिलकुमार शिंदे यांचा सोलापूर लोकसभा मतदारसंघातून पराभव झाला. तसेच ते पुन्हा दुसऱ्यांदा निवडूण येण्याची शक्यता नसल्याने निवडणूक न लढण्याची यापूर्वीच त्यांनी घोषणा केली आहे. त्यामुळे शिंदे यांना राज्यसभेवर पाठविण्याची शक्यता आहे. तसेच त्यांच्या पाठीशी दिल्लीचा अनुभव असल्याने राज्यसभेसाठी त्यांचेही नाव दिल्लीला पाठविण्यात आले असल्याचे त्यांनी सांगितले.

या दोन नावापेक्षा रत्नाकर महाजन यांच्या बाजूने महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसने मोठा भर दिला असून राज्यसभेत अभ्यासपूर्ण भाषणे आणि काँग्रेसची आक्रमक भूमिका मांडण्यासाठी रत्नाकर महाजन यांचा उपयोग होण्याची शक्यता अधिक आहे. त्यामुळे राजीव शुक्ला किंवा सुशिल कुमार शिंदे यांच्या नावाऐवजी महाजन यांच्या नावावर एकमत होण्याची शक्यता अधिक असल्याचे त्यांनी सांगितले.

तरीही अंतिम निर्णय पक्षाध्यक्ष राहुल गांधी हे घेणार असल्याने आज रात्रीत नाव फायनल होण्याची शक्यता अधिक असल्याचेही त्यांनी सांगितले.

Exit mobile version