Marathi e-Batmya

काँग्रेस-राष्ट्रवादी हे भाऊ-भाऊ पण आघाडीचा निर्णय हायकमांड घेणार

मुंबई : प्रतिनिधी

राजकारणात काँग्रेस,राष्ट्रवादी काँग्रेस हे दोन वेगवेगळे पक्ष असले तरी आम्ही भाऊ-भाऊ असल्याचे प्रतिपादन काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांनी करत राज्यात राष्ट्रवादी काँग्रेससोबत आघाडी करण्याचा निर्णय दिल्लीतील हायकमांडकडून घेण्यात येणार असल्याचे सांगितले.

आगामी विधानसभा आणि लोकसभा निवडणूंकामध्ये भाजपला रोखण्यासाठी समविचारी पक्षांची आघाडी करण्याच्या उद्देशाने राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेसच्या पक्षनेत्यांची आज मंगळवारी विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे-पाटील यांच्या निवासस्थानी बैठक झाली. या बैठकीला राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार, जयंत पाटील, दिलीप वळसे-पाटील, जितेंद्र आव्हाड, विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे हे तर कॉंग्रेसकडून प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण, विधान परिषदेचे उपसभापती माणिकराव ठाकरे, नसीम खान, विधानसभेतील विरोधी-पक्षनेते राधाकृष्ण विखे-पाटील आदी उपस्थित होते. या बैठकीनंतर पत्रकारांशी बोलताना वरील माहिती दिली.

राष्ट्रीय नेत्यांकडून आघाडीबाबत चर्चा झाल्यानंतर त्याबाबतची राज्यस्तरावरची कारवाई करण्यात येणार असल्याचे सांगत आता झालेल्या चर्चेत राज्यातील वर्तमान राजकिय परिस्थिती विधानमंडळाचे आगामी अर्थसंकल्पीय अधिवेशन आणि राज्य सरकारच्या चुकीच्या धोरणाबाबत चर्चा करण्यात आल्याचे त्यांनी सांगितले. त्याचबरोबर निवडणूकीत समविचारी पक्षांमध्ये मतांचे विभाजन होवू नये यासाठी इतर पक्षांनीही अशा चर्चांमध्ये सहभागी व्हायला पाहीजे अशी आवाहन वजा मत त्यांनी मांडले.

आगामी अर्थसंकल्पिय अधिवेशनाच्या अनुषंगाने ८ तारखेला सर्वपक्षिय विरोधकांची बैठक होणार असून या सर्वांना आघाडीमध्ये सहभागी होण्याबाबतच्या प्रश्नी चर्चा करणार असल्याची माहिती राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सुनिल तटकरे यांनी सांगितले.

Exit mobile version