Marathi e-Batmya

विधानसभा उपाध्यक्ष अण्णा बनसोडे यांचे निर्देश, महिन्यात अंमलबजावणी अहवाल सादर करा

मुंबईतील गोरेगाव येथील चित्रनगरीसह राज्यातील चित्रपट व करमणूक क्षेत्रातील कंत्राटी फिल्म कामगार आणि ज्युनिअर कलाकारांच्या विविध प्रश्नांबाबत विधानसभा उपाध्यक्ष अण्णा बनसोडे यांच्या अध्यक्षतेखाली बैठक पार पडली. कंत्राटी फिल्म कामगार आणि ज्युनियर कलाकारांच्या प्रश्नांवर तातडीने कार्यवाही करण्यासाठी संयुक्त समितीची बैठक घेण्याच्या सूचना यावेळी देण्यात आल्या. तसेच, करण्यात आलेल्या उपाययोजनांचा सविस्तर अंमलबजावणी अहवाल एका महिन्याच्या आत सादर करण्याचे निर्देशही त्यांनी यावेळी दिले.

हिवाळी अधिवेशन २०२५ दरम्यान ९ डिसेंबर २०२५ रोजी आमदार सुनील प्रभू यांनी औचित्याच्या मुद्याद्वारे चित्रपट व करमणूक क्षेत्रातील कंत्राटी फिल्म कामगार व ज्युनिअर कलाकारांवर होत असलेल्या अन्यायाचा मुद्दा उपस्थित केला होता. त्यानुसार ही बैठक आयोजित करण्यात आली होती.

उपाध्यक्ष अण्णा बनसोडे यांच्या उपस्थितीत झालेल्या बैठकीत कामाचे निश्चित तास, सकस भोजनाची व्यवस्था, वेतन थेट निर्मात्यांकडून देणे, चित्रीकरण स्थळी स्वच्छता राखणे, महिला कलाकारांसाठी कपडे बदलण्याची स्वतंत्र सुविधा तसेच रात्रीच्या चित्रीकरणानंतर सुरक्षित वाहतूक व्यवस्था उपलब्ध करून देणे आदी विषयांवर सविस्तर चर्चा करण्यात आली. शासनाच्या १४ फेब्रुवारी २०२४ रोजी जारी करण्यात आलेल्या मानक कार्यप्रणालीची (एसओपी) प्रभावी अंमलबजावणी करण्याबाबतही बैठकीत निर्देश देण्यात आले. चित्रनगरी प्रशासनाने संबंधित निर्मिती संस्थांना यापूर्वी सूचना देऊनही अपेक्षित कार्यवाही झाली नसल्याबाबत यावेळी चिंता व्यक्त करण्यात आली. राज्यातील सुमारे ५ लाख कंत्राटी फिल्म कामगार व ज्युनिअर कलाकारांच्या हितासाठी संबंधित विभागांनी समन्वयाने कार्य करून ठोस उपाययोजना कराव्यात, असे निर्देश दिले.

बैठकीस आमदार सुनील प्रभू, फिल्म सिटीच्या व्यवस्थापकीय संचालक स्वाती म्हसे-पाटील, फिल्मसिटीचे व्यवस्थापकीय सहसंचालक प्रशांत साजणीकर, सांस्कृतिक कार्य विभागाचे उप व्यवस्थापक महेश वाव्हळ, कामगार विभागाचे सह आयुक्त संकेत कानडे तसेच विविध कामगार संघटनांचे प्रतिनिधी यावेळी उपस्थित होते.

Exit mobile version