Marathi e-Batmya

मणिपूर येथील महिलांच्या व्हायरल व्हिडिओवरून सुप्रिया सुळे यांची मोदी सरकारवर टीका

भाजपाची मणिपूर राज्यात सत्ता असूनही मागील दोन महिन्याहून अधिक काळ सातत्याने हिंसाचार सुरु आहे. तसेच अमेरिका आणि फ्रांसच्या दौऱ्यावर जाणाऱ्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अद्याप मणिपूर येथे सुरु असलेल्या हिंसाचार प्रकरणी चकार शब्द काढला नाही की तेथे भेट दिली नाही. त्यातच मणिपूरमध्ये हिंसक जमावाने दोन महिलांची नग्न अवस्थेत घिंड काढल्याचा व्हिडिओ सध्या मोठ्या प्रमाणावर व्हायरल होत असून त्याबाबत राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाच्या कार्याध्यक्षा तथा खासदार सुप्रिया सुळे यांनी मोदी सरकारवर टीका करत म्हणाल्या की, महिलांच्या सन्मानाचे रक्षण करण्यात मोदी सरकार अपयशी ठरले आहे.

तसेच पुढे बोलताना सुप्रिया सुळे म्हणाल्या की, अशा घृणास्पद कृत्यांविरोधात राष्ट्रवादी काँग्रेसने ठाम भूमिका घेतली आहे आणि देशभरातील महिलांची सुरक्षा आणि सन्मान सुनिश्चित करण्यासाठी सरकारने तातडीने पावले उचलण्याची मागणी केली.

तसेच पुढे बोलताना सुप्रिया सुळे म्हणाल्या की, धक्कादायक व्हिडिओचा देशभरातील नागरिकांकडून संताप आणि व्यापक निषेध व्यक्त केला जात आहे. महिलांवरील अशा भयंकर अत्याचारांकडे समाजाने प्रेक्षकाच्या भूमिकेत राहू नये व त्यावर सरकारला जाब विचारण्याची भूमिका समाजाने घेतली पाहिजे असे मतही मांडले.

यावेळी शरद पवार गटाचे प्रवक्ते महेश तपासे म्हणाले की, महिलांच्या आत्मसन्मानाच्या रक्षणासाठी शासनाने कठोर पावलं उचलावी तसेच भारतीय समाजाला या विषयावर सचेतन करण्याची आवश्यकता असल्याचे मत व्यक्त केले.
महिलांच्या प्रतिष्ठेचे आणि सुरक्षिततेचे संरक्षण हा जन्मजात मानवी हक्क आहे व ह्यासोबत तडजोड केली जाऊ शकत नाही. अशा प्रकारच्या हिंसेमुळे आपल्या समाजाच्या नैतिक जडणघडणीला तर हरताळ फासला जातोच पण जागतिक स्तरावर आपल्या देशाची प्रतिमाही कलंकित होते असेही महेश तपासे म्हणाले.

सुप्रिया सुळे यांनी महिलांवरील हिंसाचार आणि भेदभावाच्या विरोधात लढण्यासाठी सर्व राजकीय पक्ष, सरकार, नागरी समाज यांनी एकत्र येऊन सामूहिक प्रयत्न करण्याचे आवाहन केले.

Exit mobile version