अल्पसंख्यांक संशोधन व प्रशिक्षण संस्था ( मार्टी ) आपले नियमित कामकाज लवकरच सुरू करणार आहे, अशी माहिती उपमुख्यमंत्री तथा अल्पसंख्यांक विकास विभागाच्या मंत्री सुनेत्रा पवार यांनी तारांकित प्रश्नाला गुरुवारी विधानसभेत दिली.
समाजवादी पक्षाचे भिवंडी पूर्वचे आमदार रईस शेख यांनी अल्पसंख्याक संशोधन व प्रशिक्षण संस्थेचे (मार्टी ) कामकाज संस्था स्थापन होऊन काही महिने झाले तरी प्रत्यक्षात कामकाज प्रलंबित असल्याबाबत तारांकित प्रश्न उपस्थित केला होता.
त्याला उत्तर देताना उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी सांगितले की, छत्रपती संभाजीनगर येथील हज हाऊस येथे अल्पसंख्यांक संशोधन व प्रशिक्षण संस्थेचे तात्पुरत्या स्वरूपात कार्यालय स्थापन केले आहे. संस्थेच्या कार्यालयीन खर्चासाठी या वर्षासाठी तीन कोटी बारा लक्ष रुपये पुरवणी मागण्या द्वारे मंजूर केले आहेत.
संस्थेची कंपनी कायद्यानुसार नोंदणी करण्याबाबत नुकताच सल्लागार नियुक्त केला आहे. त्यानुसार संस्थेच्या नोंदणीची कार्यवाही करण्यात येत आहे. या संस्थेच्या कामकाजास प्रारंभ करा, अशा सूचना संबंधितांना विभागाच्या वतीने देण्यात आल्या आहेत. तसेच विभागाच्या वतीने नव्याने स्थापन केलेले अल्पसंख्याक आयुक्तालय छत्रपती संभाजीनगर येथे सुरू करण्यात आलेले आहे, अशी माहिती उपमुख्यमंत्री पवार यांनी लेखी उत्तरामध्ये दिली आहे.
