Marathi e-Batmya

संजय राऊत यांच्यावरील ईडी कारवाईवरून छगन भुजबळ म्हणाले, लवकर जामीन…

शिवसेनेतील आमदार, खासदारांच्या विरोधात ईडीकडून लक्ष्य करत कारवाई करण्यास सुरुवात केली. नुकतीच संजय राऊत यांची पत्रावाला चाळ प्रकरणी चौकशी करत मध्यरात्रीनंतर अटक केली. त्या पाठोपाठ संजय राऊत यांच्या पत्नी वर्षा राऊत यांनाही ईडीने समन्स पाठविल्याचे सांगितले. यापार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते छगन भुजबळ यांनी राऊत कुटुंबियांना सूचक इशारा दिला.

संजय राऊत यांना देण्यात आलेली ईडी कोठडीच्या पार्श्वभूमीवर छगन भुजबळ म्हणाले, ईडीच्या प्रकरणात लवकर जामीन मिळत नसल्याचं म्हणत सूचक इशारा दिला आहे.

संजय राऊतांना मिळालेली ईडीची कोठडी हा न्यायालयीन कामकाजाचा भाग आहे. ईडीने न्यायालयात काही गोष्टी मांडल्या असतील. नेमक्या काय गोष्टी न्यायालयासमोर ठेवण्यात आल्या याबाबत मी ऐकलेलं नाही. मात्र, अधिक तपासासाठी न्यायालयाने संजय राऊतांना ईडी कोठडी सुनावली असावी असेही ते म्हणाले.

पत्रकारांनी संजय राऊत यांची निर्दोष सुटका होईल का? असा प्रश्न विचारला. यावर भुजबळ म्हणाले, संजय राऊत निर्दोष सुटतील की नाही याबाबत मला तसं काहीही सांगता येणार नाही. ईडीच्या प्रकरणात लवकर जामीन मिळत नाही आणि याची सर्वांना कल्पना आहे. त्यातूनही काही मार्ग निघाला तर आमच्या त्यांना शुभेच्छाच आहेत.

यावेळी छगन भुजबळांना संजय राऊतांच्या अटकेनंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार गप्प का? असा प्रश्नही विचारण्यात आला. यावर ते म्हणाले, असं काही नाही. राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे सुप्रिया सुळेंनी लोकसभेत ईडीच्या कारवाईवर चर्चा घडवून आणली आहे. त्यात त्यांनी काही गोष्टी मांडल्याचे स्पष्ट केले.

ईडीकडून नॅशनल हेराल्ड प्रकरणी सोनिया गांधी, राहुल गांधी यांची चौकशी सुरू आहे. त्याविषयी देखील त्यांना विचारले असता ते म्हणाले की, या विषयावर राष्ट्रवादी काँग्रेस विरोधी पक्षांसोबत आहे. त्यावर राष्ट्रवादीचे नेते भाष्य करत आहेत.

Exit mobile version