Marathi e-Batmya

एकनाथ शिंदे यांचे आदिलच्या कुटुंबिया आश्वासन, शिवसेना आपल्या पाठीशी कायम उभी राहील

पहेलगाम येथे दहशतवाद्यांकडून भारतीय पर्यटकांवर झालेल्या हल्ल्यावेळी त्यांचे जीव वाचवताना मृत्युमुखी पडलेल्या घोडेवाला सय्यद आदिल हुसैन शाहच्या कुटुंबियांनी आज उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेतली. यावेळी या हल्ल्यानंतर आदिलच्या बलिदानाची दखल घेऊन आपल्या कुटुंबियांना मदत केल्याबद्दल त्यांनी शिंदे यांचे आभार मानले.

पहलगाम येथे २२ एप्रिल २०२५ रोजी दहशतवाद्यांनी केलेल्या हल्ल्यात २६ भारतीय पर्यटकांचा मृत्यू झाला. ज्यावेळी हे दहशतवादी भारतीय नागरिकांना त्यांचा धर्म विचारून गोळ्या घालत होते. त्याचवेळी घोडेवाला म्हणून काम करणाऱ्या सय्यद आदिल हुसैन शाहने त्यांना मज्जाव करण्याचा प्रयत्न केला. तसेच आपल्यासोबत आलेल्या काही पर्यटकांचा जीव वाचवण्याचा प्रयत्न केला. मात्र या दहशतवाद्यांनी त्याचे तोंड बंद करण्यासाठी त्यालाही गोळ्या घालून ठार केले. त्याने दाखवलेल्या या धाडसाची देशभर चर्चा झाली.

पर्यटकांचा जीव वाचवता वाचवता त्याचा जीव गेल्याने सय्यद कुटुंबातील कमावता हात कायमचा हिरावून घेतला गेला होता. अखेर त्याने दाखवलेल्या धाडसाची दखल घेऊन उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आपले अधिकारी आणि पक्षाचे पदाधिकारी पाठवून त्यांना पाच लाखांची मदत देऊ केली होती. या मदतीची जाण ठेवून त्यांनी आज शिंदे यांची भेट घेत त्यांचे आभार मानले.

यावेळी बोलताना एकनाथ शिंदे यांनी, आपण आपला मुलगा या हल्ल्यात गमावला असून त्यापुढे केलेली ही मदत नगण्य असल्याचे मत व्यक्त केले. तसेच ही मदत देऊन आपण देशवासीयांच्या वतीने कृतज्ञता व्यक्त केली असल्याचे सांगितले. तसेच शिवसेना पक्ष हा आपल्या पाठीशी ठामपणे उभा असून यापुढेही आपल्याला लागेल ती मदत नक्की करू असे सांगितले. या हल्ल्यानंतर काश्मीरमधील परिस्थिती पूर्ववत करण्यासाठी केंद्र शासनाचे प्रयत्न सुरू आहेत. देशभरातील पर्यटकांनी पुन्हा इथे यावे आणि ही जागा पुन्हा अधिसारखीच नंदनवन व्हावी यासाठी प्रयत्न सुरू आहेत. महाराष्ट्र शासन इथे जागा घेऊन सुसज्ज असे महाराष्ट्र भवन उभारणार असून त्याद्वारे जास्तीत जास्त पर्यटकांचे पाय पुन्हा एकदा जम्मू आणि काश्मीरकडे वळतील असा विश्वास व्यक्त केला. तसेच येथील हॉटेलवाले, घोडेवाले, टुरिस्ट गाईड, छोटे मोठे दुकानदार यांना पुन्हा एकदा हक्काचा रोजगार मिळेल असे दिवस आणण्यासाठी सारे सोबत राहून पुन्हा प्रयत्न करू असेही त्यांनी यावेळी बोलताना स्पष्ट केले. आदिलच्या कुटुंबियांना लागेल ती मदत करण्यासाठी आपण नक्की प्रयत्न करू असे सांगून त्यांनी त्यांना आश्वस्त केले.
यावेळी आदिलचे आई वडील, शिवसेनेचे सर्व पदाधिकारी आणि असंख्य कार्यकर्ते उपस्थित होते.

Exit mobile version