Marathi e-Batmya

एकनाथ शिंदे यांची घोषणा, पुढील विश्व मराठी साहित्य संमेलन लंडनमध्ये आयोजित करणार

जगभरात विखुरलेल्या मराठी बांधवांना, उद्योजकांना आणि मराठी संस्कृतीला एका वैश्विक व्यासपीठावर आणण्यासाठी पुढील ‘विश्व मराठी साहित्य संमेलन’ लंडनमध्ये आयोजित करण्यात येईल अशी घोषणा उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केली. लंडन येथील ऐतिहासिक अशा महाराष्ट्र मंडळाने त्यांचा ‘ग्लोबल प्राईड ऑफ महाराष्ट्र पुरस्कार देऊन सन्मान केला. यावेळी महाराष्ट्र भवनातील वातावरण मराठीमय होऊन गेले होते. महाराष्ट्राच्या सामाजिक आणि आर्थिक उन्नतीसाठी दिलेल्या योगदानाबद्दल उपमुख्यमंत्र्यांचा हा गौरव करण्यात आला. सातासमुद्रापलीकडे मराठी माणसाने झेंडा फडकवला आहे, त्यामुळे महाराष्ट्र मंडळाच्या पाठीशी सरकार आणि एकनाथ शिंदे म्हणून मी खंबीरपणे उभा आहे असा विश्वास त्यांनी दिला.

कार्यक्रमासाठी महाराष्ट्र भवनात मोठी गर्दी झाली होती. तरुणांनी ढोल-ताशांच्या गजरात आणि मराठी परंपरेनुसार उपमुख्यमंत्र्यांचे स्वागत केले. यावेळी जय महाराष्ट्र, जय भवानी-जय शिवाजीच्या घोषणांनी आसमंत दणाणून गेला होता. उपमुख्यमंत्र्यांनीही या जोशपूर्ण स्वागताचे भाषणात कौतुक केले. आगामी गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर त्यांनी लंडनस्थित सर्व मराठी जनाला गणेशोत्सवाच्या मनःपूर्वक शुभेच्छा दिल्या. आपली संस्कृती, आपला ठसा हा उमटवावाच लागेल असेही ते म्हणाले.

यावेळी निवृत्त सनदी अधिकारी भूषण गगराणी, ज्येष्ठ कवी अशोक नायगावकर, महाराष्ट्र मंडळाचे ज्येष्ठ सदस्य डॉ गोविंद कानेगावकर, मंडळाचे अध्यक्ष वृषाल खांडके, मराठी भाषा संचालक श्यामकांत देवरे, मराठी चित्रपट निर्माते अभिनेते मंगेश देसाई त्याचप्रमाणे इतर मान्यवरांची उपस्थिती होती.

मराठी भाषकांसाठी मध्यवर्ती संस्था

यावेळी भावपूर्ण सत्काराला उत्तर देतांना उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले की, मराठी माणूस जगाच्या पाठीवर कुठेही गेला, तरी तो आपली माती, भाषा आणि संस्कृती कधीही विसरत नाही. नुकताच मराठी भाषेला केंद्र सरकारकडून ‘अभिजात भाषेचा’ दर्जा मिळाला आहे. मराठी भाषेचा हा डंका जगभरात गाजवण्यासाठी आणि जागतिक स्तरावर मराठी माणसांना मजबुतपणे जोडण्यासाठी  लंडनमध्ये विश्व मराठी साहित्य संमेलन भरवले जाईल तसेच जगभरातील मराठी भाषकांसाठी एक मध्यवर्ती संस्था स्थापन करण्याबाबतही विचार करीत असल्याचे सांगितले.

मराठी संस्कृती टिकवून ठेवा

मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळणे आणि महाराष्ट्र गीताला राज्यगीताचा दर्जा देण्याच्या निर्णयांचा उल्लेख करत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मराठी भाषा आणि संस्कृतीच्या संवर्धनाचे महत्त्व अधोरेखित केले. “लाभले आम्हास भाग्य, बोलतो मराठी,” या सुरेश भट यांच्या ओळींचा उल्लेख करत त्यांनी मराठी अस्मिता जपण्याचे आवाहन केले. महाराष्ट्र मंडळाने पुढेही लंडनमध्ये मराठी भाषा, संस्कृती आणि परंपरेचे जतन करण्याचे काम सुरू ठेवावे. तुमच्या पाठीशी सरकार आहे आणि एकनाथ शिंदेही तुमच्या पाठीशी खंबीरपणे उभा राहील, अशी ग्वाही त्यांनी यावेळी दिली.

गतिरोधक काढून टाकले

एकनाथ शिंदे पुढे बोलताना म्हणाले की, मुंबई-एमएमआरमध्ये विकासाला गती दिल्यास मोठी आर्थिक क्षमता निर्माण होऊ शकते. महाराष्ट्राने एक ट्रिलियन डॉलर अर्थव्यवस्थेचे लक्ष्य ठेवले असून राज्याला देशाच्या विकासात मोठी भूमिका बजावायची आहे. “सरकार विकासाच्या ब्रेकवर नाही, तर ॲक्सिलेटरवर आहे,” असे सांगत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली देशाच्या विकासात महाराष्ट्राचा सिंहाचा वाटा असावा, हीच राज्य सरकारची भूमिका असल्याचे स्पष्ट केले.

एकनाथ शिंदे पुढे म्हणाले की, मी मुख्यमंत्री झाल्यावर गणपती उत्सव, दहीहंडी वगैरे परत उत्साहाने साजरे करायला सुरुवात केली. आपले सण, उत्सव, परंपरा, तुम्ही लंडनमध्ये येऊन सुद्धा सोडत नाहीत, मग महाराष्ट्रात बंद कसं करून चालेल असे ते म्हणाले

पायाभूत सुविधांमध्ये महाराष्ट्र देशात अव्वल

अटल सेतू, समृद्धी महामार्ग, मुंबई-पुणे मिसिंग लिंक टनेल आणि ७६ हजार कोटी रुपयांच्या वाढवण बंदराचा उल्लेख करत, महाराष्ट्र हे देशाचे ‘ग्रोथ इंजिन’ व ‘पावर हाऊस’ बनले असून राज्य १.५ ट्रिलियन डॉलर अर्थव्यवस्थेच्या दिशेने वेगाने वाटचाल करत असल्याचे त्यांनी नमूद केले.

समृद्धी महामार्गाचा अनुभव सांगताना त्यांनी विकास प्रकल्पांसाठी सरकार आणि जनतेमधील विश्वास किती महत्त्वाचा आहे, यावर भर दिला. समृद्धी महामार्गासाठी जमीन देणाऱ्या शेतकऱ्यांना मोबदला देताना आपल्या उपस्थितीत करार करण्यात आले आणि त्यानंतर काही तासांतच आरटीजीएसद्वारे त्यांच्या खात्यात पैसे जमा झाले, असा अनुभव त्यांनी सांगितला. या विश्वासामुळे जमीन संपादनाची प्रक्रिया विक्रमी वेळेत पूर्ण होण्यास मदत झाली, असे ते म्हणाले.

लंडनशी महाराष्ट्राचे संबंध जुने

भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर, लोकमान्य टिळक आणि स्वातंत्र्यवीर सावरकर यांचा लंडनशी सबंध येऊन गेला आहे असे सांगून उपमुख्यमंत्र्यांनी बाबासाहेबांच्या लंडनमधील वास्तव्याच्या ठिकाणाचे स्मारक महाराष्ट्र सरकारने विकसित केल्याचे सांगितले.

लंडनमध्ये ज्या वास्तूत बाबासाहेबांचे वास्तव्य होते, तेथे नतमस्तक होण्याचे भाग्य मला लाभले. बाबासाहेबांनी लिहिलेल्या अद्वितीय संविधानामुळेच आज माझ्यासारखा सर्वसामान्य कुटुंबातील कार्यकर्ता राज्याच्या सर्वोच्च पदावर सेवा करू शकत आहे, अशा भावना त्यांनी या वेळी व्यक्त केल्या.

महाराष्ट्राचा विकास, महाराष्ट्राची प्रगती हाच आमचा अजेंडा आहे, असे सांगत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी उपस्थितांना शुभेच्छा दिल्या.

Exit mobile version