Marathi e-Batmya

एकनाथ शिंदे यांची ग्वाही, अहिल्यादेवी होळकरांच्या आदर्शाने राज्याचा विकास

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या ३०१ व्या जयंतीनिमित्त ठाण्यातील धनगर प्रतिष्ठान आयोजित अहिल्यादेवी होळकर स्मारक उद्घाटन आणि धनगर रत्न पुरस्कार सोहळ्यात उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी अहिल्यादेवींच्या कार्याचा गौरव करत त्यांच्या आदर्शांवर राज्य कारभार चालवत असल्याचे सांगितले. स्मारक उभारणीसाठी योगदान देता आले, हे आपले भाग्य असल्याची भावनाही यावेळी व्यक्त केली.

यावेळी बोलताना एकनाथ शिंदे म्हणाले की, “अहिल्यादेवी होळकर यांचे कार्य जगप्रसिद्ध आहे. त्यांनी देशभरातील अनेक मंदिरे, घाट, धर्मशाळा आणि अन्नछत्रे उभारून समाजसेवेचा आदर्श निर्माण केला. त्यांच्या स्मारकासाठी छोटासा का होईना हातभार लावता आला, याचा मला अभिमान आहे.”

स्मारक उभारणीसाठी पुढाकार घेतलेल्या संस्थेचे विशेष अभिनंदन करत एकनाथ शिंदे यांनी सांगितले की, मर्यादित जागेतही अत्यंत सुंदर आणि प्रेरणादायी स्मारक उभे राहिले आहे. अहिल्यादेवींच्या कार्याला खरी श्रद्धांजली म्हणजे त्यांच्या विचारांचा वारसा पुढे नेणे होय, असेही सांगितले.

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आपल्या मुख्यमंत्रीपदाच्या कार्यकाळातील निर्णयांची आठवण करून देताना सांगितले की, चौंडी येथे झालेल्या जयंती सोहळ्यात अहमदनगर जिल्ह्याचे नामकरण “अहिल्यादेवी नगर” करण्याचा ऐतिहासिक निर्णय घेण्यात आला. तसेच शेतकऱ्यांसाठी करण्यात आलेल्या कर्जमाफी योजनेलाही पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांचे नाव देण्यात आले असल्याचे नमूद केले.

महिलांच्या सक्षमीकरणासाठी राज्य सरकार कटिबद्ध असल्याचे सांगताना उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी, “मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण” योजनेचा उल्लेख केला.

एकनाथ शिंदे पुढे बोलताना म्हणाले की, अहिल्यादेवींनी महिलांना नेतृत्व, स्वावलंबन आणि समाजकार्यात पुढे येण्याचा संदेश दिला. त्याच विचारातून आम्ही महिलांना आर्थिकदृष्ट्या सक्षम करण्यासाठी विविध योजना राबवत आहोत. अहिल्यादेवींच्या कल्याणकारी राज्य कारभाराचा आदर्श आजही प्रेरणादायी असल्याचे सांगत शेतकरी, महिला आणि सर्वसामान्य नागरिकांच्या हितासाठी सरकार सातत्याने काम करत असल्याचा पुनरुच्चार केला.

शेवटी बोलताना एकनाथ शिंदे म्हणाले की, “छत्रपती शिवाजी महाराज आणि पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांचा आदर्श डोळ्यासमोर ठेवून आम्ही राज्याचा विकास साधत आहोत. त्यांच्या कार्याची उंची इतकी मोठी आहे की, अशा शेकडो स्मारकांची उभारणी केली तरी ती कमीच पडतील,” असे भावनिक उद्गारही काढले.

या कार्यक्रमाला माजी खासदार विकास महात्मे, माजी खासदार आनंद परांजपे, माजी आमदार रवींद्र फाटक, ठाणे मनपातील विरोधी पक्षनेते शानू पठाण, ठाणे विधानसभा प्रमुख हेमंत पवार, नौपाडा विभागप्रमुख किरण नाकती, शिवसेना प्रवक्ते राहुल लोंढे, पत्रकार आणि धनगर प्रतिष्ठानचे अध्यक्ष दीपक कुरकुंडे आणि धनगर समाजातील मान्यवर, सामाजिक कार्यकर्ते, पदाधिकारी आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

दरम्यान, विविध क्षेत्रांमध्ये उल्लेखनीय कार्य करणाऱ्या मान्यवरांना “धनगररत्न पुरस्कार” प्रदान करून गौरविण्यात आले. कला क्षेत्रातील दत्तात्रय चिव्हाणे, शैक्षणिक क्षेत्रातील भगवान आसाराम गावडे, साहित्य क्षेत्रातील डॉ. महादेव गिरकर, सामाजिक क्षेत्रातील बिरू कोळेकर, शासकीय क्षेत्रातील संध्या खताळ, राजकीय क्षेत्रातील निहारिका खोंदले तसेच वैद्यकीय क्षेत्रातील डॉ. सुवर्णा चोपडे यांना पुरस्कार देऊन त्यांच्या कार्याचा सन्मान करण्यात आला. उपस्थितांनी पुरस्कार विजेत्यांचे टाळ्यांच्या कडकडाटात अभिनंदन केले.

Exit mobile version