Marathi e-Batmya

जीवनावश्यक वस्तू घरपोच करण्यासाठी पालिका, स्वंयसेवी संस्थानी पुढे यावे

मुंबई : प्रतिनिधी

कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी राज्यात २१ दिवसांचा लॉकडाऊन जाहीर करण्यात आला. तसेच याकाळात अत्यावश्यक धान्य, औषधे, गँस यासह दैनदिंन जीवनात लागणाऱ्या गोष्टी मुबलक प्रमाणात उपलब्ध करून दिल्या. तरीही नागरीकांकडून रस्त्यांवर गर्दी करण्यात येत असल्याच्या पार्श्वभूमीवर भाजीपाला, धान्य, औषधे नागरीकांना घरपोच देण्यासाठी स्थानिक स्वराज्य संस्था अर्थात महानगरपालिका, नगरपालिकांनी नियोजन करावे असे आवाहन करत बेघरांना, गरीबांना, विद्यार्थ्यांना जेवण पुरविण्यासाठी स्वयंसेवी संस्थांनी पुढाकार घ्यावा असे आवाहन राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केले.

करोना विषाणू प्रतिबंधक कर्तव्य बजावणाऱ्या पोलिस, वैद्यकीय अधिकारी, कर्मचाऱ्यांवरील हल्ल्याच्या घटना कदापिही सहन केल्या जाणार नाहीत, असे हल्ले करणाऱ्यांवर गुन्हा दाखल करुन कायद्यानुसार कारवाई केली जाणार असल्याचा इशारा त्यांनी देत पोलिस आणि नागरिक दोघांनीही स्वयंशिस्त, संयम पाळावी अन्यथा ‘लॉकडाऊन’च्या अंमलबजावणीसाठी अमेरिकेत लष्कराची मदत घेण्यात आली  आहे. आपल्या राज्यात ती वेळ येऊ न देणे ही आपली सर्वांची जबाबदारी असल्याचे मतही त्यांनी यावेळी व्यक्त केले.

राज्यात २१ दिवसांचा ‘लॉकडाऊन’, संचारबंदी असली तरी  दुध, भाजीपाला, फळे, औषधे, अन्नधान्य, कुकिंग गॅस आदी जीवनावश्यक वस्तूंचा पुरवठा नियमित सुरु आहे. तरीही बाजारात खरेदीसाठी होणारी नागरिकांची गर्दी चिंताजनक आहे. या पार्श्वभूमीवर जीवनावश्यक वस्तू घरपोच किंवा सोसायटी परिसरात उपलब्ध करण्याबाबत स्थानिक स्वराज संस्थांनी नियोजन करावे, अशा सूचनाही त्यांनी दिल्या. बारामती, वाई शहरात अशी व्यवस्था करण्यात आल्याचे त्यांनी सांगितले.

शहरात एकाकी राहत असलेले ज्येष्ठ नागरिक, विद्यार्थी, रस्त्यावर राहणारे गरीब, बेघर यांच्या भोजनाची सोय करण्यासाठी समाजाने, स्वयंसेवी संस्थांनी पुढे यावे, असे आवाहन त्यांनी केले.

प्रवासबंदी असताना काही जणांनी दुधाच्या टँकरमध्ये बसून प्रवास केल्याच्या घटना पुढे आल्या आहेत. ही बेपर्वाई चिंताजनक आहे. वसईत पोलिस अधिकाऱ्याच्या अंगावर दुचाकी घालून त्यांना गंभीर जखमी करण्यात आले. बीडमध्येही पोलिसांवर हल्ला करण्यात आला. मालेगावात लोकप्रतिनिधींकडूनच वैद्यकीय अधिकाऱ्यांना मारहाण करण्यात आली. अशा घटनांमुळे करोनाविरुद्धच्या लढ्याला धक्का बसत आहे. जनतेने करोनाचे गांभीर्य ओळखून वर्तन ठेवावे, पोलिसांना सहकार्य करावे, असे आवाहनही  त्यांनी केले आहे.

मध्यप्रदेशमध्ये माजी मुख्यमंत्र्यांच्या शेवटच्या पत्रकार परिषदेत उपस्थित असलेल्या एका पत्रकार बांधवाला कोरोनाचा प्रादुर्भाव झाला असल्याचे समोर आले आहे. त्यामुळे तेथे माजी मुख्यमंत्री आणि उपस्थित पत्रकारांना संसर्ग झाला असण्याची भीती व्यक्त होत आहे. या पार्श्वभूमीवर आपल्या राज्यातील लोकप्रतिनिधी आणि पत्रकार बांधवांनी ‘ऑनलाईन’ संवाद साधून सुरक्षितता राखावी, असे आवाहनही त्यांनी यावेळी केले.

उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या आवाहनातील मुद्दे..

Exit mobile version