नेपाळ-तिबेट परिसरातील भूकंप, पूर आणि भूस्खलनाच्या पार्श्वभूमीवर तेथे गेलेल्या महाराष्ट्रातील पर्यटकांची माहिती संकलित करण्यात येत आहे. आतापर्यंत चार पर्यटकांशी संपर्क झाला असून ते सुखरूप आहेत. केंद्र सरकारशी सातत्याने संपर्क सुरू असून यंत्रणा 24 तास सतर्क असल्याचे आपत्ती व्यवस्थापन मंत्री गिरीश महाजन यांनी सांगितले.
मंत्री गिरीश महाजन म्हणाले, प्रशासनाकडे 80 लोकांची माहिती प्राप्त झाली आहे. मात्र तिथे मोबाईल नेटवर्कचा प्रॉब्लेम झाल्यामुळे तसेच दूरध्वनी सेवा खंडित झाल्यामुळेदेखील संपर्क होत नाही. मात्र नातेवाईकांनी घाबरून जाऊ नये. केंद्र व राज्य सरकार महाराष्ट्रातील सर्व पर्यटकांशी संपर्क साधण्याचा प्रयत्न करत आहे.
रिचार्ड टूर्स ट्रॅव्हल्स कंपनीच्या दोन गाड्यांमधून पर्यटक मानस सरोवर येथे गेले आहेत. त्यापैकी एका गाडीतील जवळपास 37 जण सुरक्षित आहेत. पूर आणि भूस्खलनामुळे तेथील दळणवळण व्यवस्था विस्कळीत झाल्याने काही पर्यटकांशी दूरध्वनीवरून संपर्क साधण्यात अडचणी येत आहेत. उर्वरित पर्यटकांचा शोध घेऊन त्यांच्याशी संपर्क साधण्याचे प्रयत्न सुरू असल्याचे मंत्री महाजन यांनी सांगितले.
सर्व जिल्हाधिकाऱ्यांना आपापल्या जिल्ह्यांमधून या भागात पर्यटनासाठी गेलेल्या नागरिकांची माहिती संकलित करण्यास सांगण्यात आले आहे. नागरिकांकडे यासंदर्भात अतिरिक्त माहिती असल्यास ती उपलब्ध करून द्यावी, असे आवाहन करण्यात आले आहे. माहिती देण्यासाठी वेबसाइटही 24 तास (24×7) खुली ठेवण्यात आली आहे.
नागरिकांना आवाहन
नेपाळ येथे अडकलेल्या नागरिकांची माहिती संकलित करण्यासाठी आणि त्यांना तत्काळ आवश्यक ती मदत पोहोचवण्यासाठी महाराष्ट्र राज्य आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण (मंत्रालय, मुंबई) यांच्यातर्फे खालील लिंक उपलब्ध करून देण्यात आली आहे.
माहिती नोंदवण्यासाठी लिंक:
https://geospatial.mahaseoc.in/Sahayata_gulf/
नेपाळमध्ये निर्माण झालेल्या पूरस्थितीमुळे महाराष्ट्रातील नागरिकांसाठी हेल्पलाईन नंबर्स जारी करण्यात आले आहेत. मंत्रालयातील नियंत्रण कक्ष 24 तास कार्यरत असून ज्यांना कुठल्याही प्रकारच्या मदतीची गरज आहे, त्यांनी खालील क्रमांकावर संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात येत आहे.
राज्य नियंत्रण कक्ष हेल्पलाईन: 1070 (टोल-फ्री क्रमांक)
- नियंत्रण कक्ष +91-9321587143
- अधिकृत ई-मेल:controlroom@maharashtra.gov.in
महाराष्ट्रातील नागरिक किंवा पर्यटक नेपाळमध्ये अडकले असतील, तर त्यांच्या कुटुंबातील सदस्य किंवा नातेवाईकांनी लिंकवर जाऊन त्यांची सविस्तर माहिती भरावी असे आवाहनही करण्यात आले आहे.
