Marathi e-Batmya

आंदोलनात सहभागी होणाऱ्या सरकारी कर्मचाऱ्यांवर शिस्तभंगाची कारवाई

मुंबई : प्रतिनिधी

राज्यातील शासकिय कर्मचारी-अधिकाऱ्यांच्या संघटनांच्यावतीने आपल्या विविध मागण्यांच्या प्रश्नी महामोर्चाचे आंदोलन करण्यात येणार आहे. या आंदोलनात सहभागी होणाऱ्या कर्मचारी-अधिकाऱ्यांवर शिस्तभंगाची कारवाई करण्याचा फतवा राज्य सरकारच्या सामान्य प्रशासन विभागाकडून काढण्यात आला आहे.

शासकिय सेवेतील कर्मचारी-अधिकाऱ्यांची राज्य सरकारी कर्मचारी मध्यवर्ती संघटनेच्यावतीने २२ फेब्रुवारी २०१८ रोजी महामोर्चाचे आंदोलन मंत्रालयासमोर करण्यात येणार आहे. ही संघटना मान्यताप्राप्त संघटना नसल्याने या मोर्चात कोणत्याही अधिकारी-कर्मचाऱ्यांनी सहभागी होवू नये असे आवाहन राज्य सरकारकडून करण्यात आले आहे. तसेच या महामोर्चात सहभागी होवू नये यासाठी संबधित विभागाच्या उच्च अधिकाऱ्यांनी महामोर्चात सहभागी होवू इच्छिणाऱ्यांचे मन वळविण्याचा प्रयत्न करावे असे स्पष्ट निर्देशही देण्यात आले आहे.

जे अधिकारी-कर्मचारी कार्यालयीन वेळेत या महामोर्चात सहभागी होतील त्यांच्यावर शिस्तभंगाची कारवाई करण्याचा इशारा देण्यात आला असून अशा मोर्चा, निदर्शने आणि आंदोलनात सहभाग नोंदविण्यास प्रतिबंध करण्यात आल्याचेही सामान्य प्रशासनाकडून जारी करण्यात आलेल्या पत्रकात सांगण्यात आले आहे.

 

Exit mobile version