सातारा जिल्हा परिषद अध्यक्ष निवडीच्या पार्श्वभूमीवर साताऱ्यातील राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे आणि सार्वजनिक बांधकाममंत्री शिवेंद्रराजे भोसले यांनी आज घेतलेल्या पत्रकार परिषदेत पालकमंत्री शंभूराज देसाई यांच्यावर गंभीर आरोप केले.
यावेळी बोलताना जयकुमार गोरे यांनी आरोप केला की, स्वर्गीय यशवंतराव चव्हाण यांच्या जिल्ह्यात पालकमंत्री शंभूराज देसाई यांनी लोकशाहीचा खून केला असून प्रशासकीय अधिकाऱ्यांना घरगड्यासारखी वागणूक दिली जात आहे, असा घणाघाती आरोप केला.
पुढे बोलताना जयकुमार गोरे म्हणाले की, पालकमंत्री कालपासून विनाकारण आकांडतांडव करत आहेत. मागेपुढे पाच गाड्यांचा ताफा घेऊन फिरणे आणि पोलिसांची छळवणूक करणे हे त्यांचे नित्याचे झाले आहे. चौकात पोलीस दिसला नाही तर त्याला निलंबित करण्याच्या धमक्या दिल्या जातात. साक्षात पोलीस अधीक्षकांशी बोलतानासुद्धा ते एखाद्या घरगड्याशी बोलल्यासारखे वागतात, हे अत्यंत निंदनीय असल्याची टीका केली.
जयकुमार गोरे पुढे म्हणाले की, जिल्हा परिषद अध्यक्षांची ही निवडणूक होती, त्यात पालकमंत्र्यांना आत जाण्याची काय गरज होती? असा सवाल उपस्थित करत जिल्हा परिषदेच्या इतिहासात आजवर कधीही अशा पद्धतीने बैठक झाली नव्हती, मग कालच ती कशी झाली? असा प्रश्नही यावेळी प्रशासनाला विचारला.
पुढे बोलताना जयकुमार गोरे म्हणाले की, ज्या सदस्यांवर ३०७ सारखे गंभीर गुन्हे दाखल आहेत, त्यांना पालकमंत्री स्वतः हाताला धरून आत कसे घेऊन जाऊ शकतात? हा गुन्हा कोणी दाखल केला आहे, हे माध्यमांना का सांगितले गेले नाही? असा सवालही यावेळी करत जर तुमचा तुमच्याच सदस्यांवर विश्वास नव्हता, तर त्यांना ४५ दिवस डांबून का ठेवले होते? गाडीतून उतरवून त्यांना जबरदस्ती हाताला धरून नेणे ही लोकशाही आहे का? असासवालही यावेली केला.
शेवटी बोलताना जयकुमार गोरे यांनी शंभूराज देसाई यांना इशारा देताना म्हणाले, पाटण आणि वाईमध्ये काय चाललंय हे जनतेला माहीत आहे. लक्षात ठेवा, जे पेरलंय ते कधीतरी नक्कीच उगवतं, असा गर्भित इशारा पालकमंत्री शंभूराज देसाई आणि मंत्री मकरंद पाटील यांना दिला.
