Marathi e-Batmya

अजित पवार यांची स्पष्टोक्ती, आगामी निवडणूकांमध्ये मविआसोबत मित्रपक्षांनाही स्थान…

लोकसभा आणि विधानसभा निवडणुका एकत्रित होण्याची शक्यता लक्षात घेऊन महाविकास आघाडीच्या माध्यमातून लोकसभेच्या ४८ व विधानसभेच्या २८८ जागांचे वाटप करुन कोणत्या व कुणी लढवाव्यात यावर सविस्तर चर्चा काल महाविकास आघाडीच्या बैठकीत झाली. मात्र याबाबतची सविस्तर चर्चा मविआच्या सहा जणांच्या बैठकीत ठरविण्यात येणार असल्याची माहिती विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी माध्यमांशी संवाद साधताना दिली.

दरम्यान लोकसभेसोबतच विधानसभेच्या निवडणुका होतील. एकदा निवडणूका लागल्यावर धावपळ व्हायला नको म्हणून त्याबद्दलही चर्चा बैठकीत झाल्याचे अजित पवार म्हणाले.

अजित पवार म्हणाले, कर्नाटकचा निकाल लागल्यानंतर शरद पवारसाहेबांनी उध्दव ठाकरे, नाना पटोले, अशोक चव्हाण, बाळासाहेब थोरात यांच्याशी संपर्क साधला. त्यानुसार रविवारी महाविकास आघाडीची बैठक झाली. या बैठकीतील चर्चेची माहिती जयंत पाटील, संजय राऊत, नाना पटोले यांनी माध्यमांना दिलीच आहे असेही स्पष्ट केले.

पुढे बोलताना अजित पवार स्पष्ट केले की, २०१४ पासून कालच्या कर्नाटकाच्या निकालापर्यंत काही राज्यांचा अपवाद वगळता नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली केंद्रात दोन वेळा सरकार आणि वेगवेगळ्या राज्यात सरकारे आली. त्यामुळे भाजपामध्ये उत्साह पहायला मिळायचा. मात्र यामुळे विरोधक नाऊमेद झाले होते. १३ मे रोजी कर्नाटकचा निकाल आला आणि एक्झिट पोलचे अंदाजही चुकले. काँग्रेसने १३५ पर्यंत मजल मारली, त्यामुळे विरोधकांचा उत्साह द्विगुणित झालेला पहायला मिळाला. पुढची लाईन ऑफ अॅक्शन महाविकास आघाडीची महाराष्ट्रात काय असली पाहिजे आणि कशा पद्धतीने राहिलेली वज्रमूठ सभा झाली पाहिजे यावर चर्चा झाली. याशिवाय मागच्या निवडणुकीत काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेसने आघाडी करुन निवडणूका लढवल्या होत्या. यावेळी महाविकास आघाडी करुन निवडणूक लढवण्याचा निर्णय झाल्याचे सांगितले.

त्याचबरोबर अजित पवार म्हणाले, निवडणूकांतील जागा वाटप म्हटल्यावर तिन्ही पक्ष नावे देणार आहेत. त्यातून बैठक होईल. त्यासाठी तिन्ही पक्षातील दोघेजण अशी सहा जणांची समिती स्थापन करून पुढच्या लोकसभेच्या ४८ जागा व विधानसभेच्या २८८ जागांचे वाटप कसे करायचे. याशिवाय फक्त तीनच पक्ष नाही तर या तिन्ही पक्षांशी संबंधित मित्रपक्ष आहेत. त्यांनाही जागा वाटपात बरोबर घेणार असल्याचे सांगितले.

विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर परदेश दौऱ्यावर आहेत. त्यामुळे विधानसभा उपाध्यक्ष नरहरी झिरवाळ यांच्याकडे आज शिवसेनेच्या सदस्यांनी अर्ज दाखल केला. अध्यक्ष आल्यावर त्यांना उपाध्यक्ष माहिती देतील आणि विधानसभा अध्यक्ष लवकर निर्णय देतील अशी अपेक्षा अजित पवार यांनी व्यक्त केली.

Exit mobile version