Marathi e-Batmya

विधान परिषदेच्या ११ जागांसाठी १२ जुलैला मतदान; हे आमदार होणार निवृत्त

लोकसभा निवडणूकीपाठापाठ महाराष्ट्रात महाविकास आघाडी आणि महायुतीकडून आगामी विधानसभा निवडणूकांची तयारी सुरु केल्यानंतर राज्यसभेच्या एका जागेसाठी आणि विधान परिषदेच्या शिक्षक आणि पदवीधर मतदारसंघातील चार जागांसाठी निवडणूक जाहिर झाली. आता त्यातच विधान परिषदेवरील ११ विद्यमान सदस्य अर्थात आमदार २७ जुलै २०२४ रोजी निवृत्त होत आहेत. त्यामुळे या रिक्त होणाऱ्या ११ जागांसाठी १२ जुलै रोजी मतदान घेण्यात येणार असल्याचे निवडणूक प्रक्रियेची माहिती केंद्रीय निवडणूक आयोगाने जारी केली.

विधान परिषदेतील एकनाथ शिंदे गटाच्या शिवसेनेच्या आमदार डॉ मनिषा कायंदे, भाजपाचे रमेश पाटील, भाजपाचे निलय मधुकर नाईक, भाजपाचे विजय गिरकर, भाजपाचे रामराव पाटील, राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे बाबाजानी दुर्राणी, भाजपा-राष्ट्रीय समाज पक्षाचे महादेव जानकर, शेकापचे जयंत पाटील, शिवसेना उबाठाचे अनिल परब, काँग्रेसच्या प्रज्ञा सातव, वजाहत मिर्झा हे ११ सदस्य निवृत्त होत आहेत.

या सर्व विधान परिषद सदस्य विधानसभा सदस्यांमधून निवडूण विधान परिषदेत गेले होते. मात्र मध्यंतरीच्या काळात शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात झालेल्या फुटीच्या पार्श्वभूमीवर आता दोन्ही पक्षांतील बरेचसे संख्याबळ हे अजित पवार यांच्या राष्ट्रवादी सोबत आणि एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेसोबत आहेत. त्यामुळे या निवडणूकीत शरद पवार गटाकडून आणि उद्धव ठाकरे यांच्या गटाचे उमेदवार निवडणूकीच्या रिंगणात उतरण्याची शक्यता जवळपास नाही.
विधान परिषदेच्या या निवडणूकीसाठी २५ जून रोजी नोटीफिकेशन जारी होईल, तर २ जुलै पर्यंत उमेदवारी अर्ज दाखल करण्याची अंतिम तारिख राहणार आहे. तर अर्जाची छाणनी ३ जुलै रोजी होईल ५ जुलै रोजी अर्ज मागे घेण्याची तारिख आहे. १२ जुलै रोजी या रिक्त जागेसाठी मतदान घेण्यात येणार असून त्याच दिवशी संध्याकाळी निकाल जाहिर करण्यात येणार आहे.

मतांचा कोटाः

विधान परिषदेच्या एकूण ११ जागांसाठी आणि निधन झालेल्या आणि खासदार पदी निवडूण केलेल्या आमदारांमुळे विधानसभेचे २७४ आमदार विधान परिषदेच्या उमेदवारांना मतदान करणार आहेत. त्यामुळे विजयासाठी प्रत्येक विधान परिषदेच्या आमदाराला २३ मते मिळविणे आवश्यक ठरणार आहे. ज्या विधान परिषदेच्या उमेदवाराला २३ मते मिळतील तोच उमेदवार निवडूण येऊ शकतो.

विधानसभेतील रिक्त जागा

याशिवाय विधानसभेतील अनेक आमदार लोकसभेवर निवडूण गेल्याने लोकसभा निवडणूकीत विजयी झालेल्यांच्या जागाही रिक्त होणार आहेत. त्यामध्ये शिवसेना शिंदे गटाचे विधानसभा आमदार तथा राज्याचे फलोत्पादान मंत्री संदीपान भुमरे, तसेच उत्तर मध्यचे उमेदवार रविंद्र वायकर, काँग्रेसच्या आमदार वर्षा गायकवाड, प्रणिती शिंदे, प्रतिभा धानोरकर, बळवंत वानखेडे हे विजयी झालेल्या खासदारांच्या जागा रिक्त झाल्या. मात्र राजू पारवे यांनी विधानसभा सदस्यत्वाचा राजीनामा दिलेला आहे त्यामुळे त्यांची ही जागा रिक्त राहणार आहे, तसेच राष्ट्रवादी शरद पवार गटाचे निलेश लंके, यांच्यासह भाजपाचे अशोक चव्हाण यांनी विधानसभा सदस्यत्वाचा राजीनामा दिला. त्यामुळे त्यांची एक जागा, यासह गोवर्धन शर्मा, राजेंद्र पटणी, अनिल बाबर. पी.एन पाटील यांचे निधन झाल्यामुळे यांच्याही जागा रिक्त राहणार आहेत.

Exit mobile version