Marathi e-Batmya

राज्यमंत्री माधुरी मिसाळ यांचे निर्देश, सर्व बसस्थानकांमध्ये तृतीयपंथीयांना राखीव स्वच्छतागृहे

राज्यातील परिवहन महामंडळाच्या बसेसचे होणारे अपघात कमी करण्यासंदर्भात ठोस पावले उचलण्यात यावीत. राज्यातील सर्व बस स्थानकांवर तृतीयपंथीयांना राखीव स्वच्छतागृह उपलब्ध करून द्यावे. तसेच बस स्थानक परिसर स्वच्छ व उत्तम सोयी सुविधायुक्त ठेवण्यात यावा, असे निर्देश परिवहन राज्यमंत्री माधुरी मिसाळ यांनी दिले.

एसटी महामंडळाच्या आढावा बैठकीचे आयोजन राज्यमंत्री माधुरी मिसाळ यांच्या अध्यक्षतेखाली करण्यात आले. बैठकीला परिवहन महामंडळाचे उपाध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक डॉ.माधव कुसेकर, वित्तीय सल्लागार व मुख्य लेखा अधिकारी गिरीश देशमुख, महाव्यवस्थापक नंदकुमार कोळकर व अन्य अधिकारी उपस्थित होते.

राज्यमंत्री माधुरी मिसाळ यांनी महामंडळाच्या बसचे होणारे अपघात कमी करण्यासाठी उपाययोजना करण्याबाबत सूचना देत प्रवाशांसाठी आवश्यक त्या सोयी-सुविधा आणि बसचे वाहक व चालक यांच्या मुक्कामी असणाऱ्या ठिकाणी सोयी सुविधा उपलब्ध करून देण्याबाबत सूचना दिल्या.

यासोबतच निवासस्थान प्रकल्प लवकरात लवकर मार्गी लावण्याच्या सूचनाही दिल्या. बसस्थानक व लोकांना उत्तम सुविधा व सुरक्षित प्रवासासाठी आगामी काळात विविध उपाययोजना राबविण्यात येणार असल्याचेही राज्यमंत्री माधुरी मिसाळ यांनी सांगितले.

Exit mobile version