महाराष्ट्रात सध्या ऐतिहासिक अशी राजकीय घडामोड सुरु आहे. ऐतिहासिक यासाठी कारण केवळ अडीच वर्षात दुसऱ्यांदा राज्यात कुणाचे सरकार येणार यावर मोठे प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. खासदार सुप्रिया सुळे मात्र दरवर्षीप्रमाणे तुकाराम महाराज पालखी सोहळ्यात वारकऱ्यांच्या सोबतीने टाळ मृदुंगाच्या तालावर विठ्ठलाचा जयघोष करताना दिसल्या. सुप्रिया सुळे एका बाजुला वारकऱ्यांसाठी भाकऱ्या थापतायत, वारकरी बनून त्यांच्यात मिसळतायत. तर दुसऱ्या बाजुला गुवाहटीत पंचतारांकित हॉटेलमध्ये मजा करणाऱ्या आमदारांचे कोट्यवधीचे बिल कोण देतंय? याकडे जनतेचं लक्ष वेधत आहेत. अध्यात्म, राजकारण, कुटुंब, समाजकारण आणि वडील शरद पवार यांच्यासोबत खांद्याला खांदा लावून पॉलिटिकल वॉर ठामपणे लढत असलेल्या सुप्रिया सुळेंचे चौफेर व्यक्तिमत्वच राज्याला दिसत आहे.
राज्यात मागच्या काही काळात राज्यसभा आणि विधान परिषदेच्या रिक्त जागांसाठी निवडणूक झाली. या दोन्ही निवडणुकांसाठी सुप्रिया सुळे स्वतः विधानभवनात उपस्थित होत्या. ज्या हॉटेलमध्ये आमदारांची बैठकी घेण्यात येत होत्या, तिथेही सुप्रिया सुळेंनी हजेरी लावली होती. सुप्रिया सुळे खासदार असल्या तरी राज्यातील राजकारणावर देखील त्यांचा तेवढाच वचक असल्याचे वारंवार दिसून येत आहे.
शिवसेनेतील आमदारांच्या बंडखोरीनंतर खा. सुप्रिया सुळे यांनी गुवाहटीमधील पंचतारांकित हॉटेल आणि जेट विमानाच्या खर्चावरुन थेट भाजपवर निशाणा साधला. याआधी देखील केंद्रीय यंत्रणांच्या गैरवापरावर सुप्रिया सुळेंनी आक्रमक भूमिका घेतलेली आहे. तसेच देवेंद्र फडणवीस यांच्यावर वेळोवेळी कठोर टीका केलेली आहे. त्यामुळे आपले वडील शरद पवार यांच्यासारखेच पॉलिटिकल फ्रंटवर येऊन वॉर करण्याची भूमिका सुप्रिया सुळे नेहमीच घेताना दिसतात.
एसटी आंदोलकांना सामोरे जाण्याचे धाडस दाखवले
दोन महिन्यांपुर्वी एसटी आंदोलनाचा मुद्दा गाजला होता. हायकोर्टाच्या निकालानंतर दुसऱ्या दिवशी अचानक शेकडो एसटी आंदोलक शरद पवार यांच्या घरावर चाल करुन गेले होते. तेव्हा मोठ्या धाडसाने सुप्रिया सुळे त्यांना सामोरे गेल्या. आक्रमक झालेल्या कामगारांना चर्चेचे आवाहन करत होत्या. आज शिवसेनेचे आमदार शिवसैनिकांनाच घाबरून गुवाहटीत बसले असताना सुप्रिया सुळे आक्रमक आणि हिंसक झालेल्या कर्मचाऱ्यांसमोर धीटपणे सामोरे गेल्यामुळे त्यांच्यातील धाडसीपणाची झलक आपल्याला दिसली.
सध्या वारीच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्रात एकाबाजुला कष्टकरी, शेतकरी वर्ग अध्यात्मात रंगला आहे. दोन वर्षानंतर पंढरपुरला दिंडी चालली आहे. राजकारण तापलं असतानाही सुप्रिया सुळे नेहमीप्रमाणे दिंडीत सामील झाल्या. वारकऱ्यांसोबत चालल्या, फुगडी खेळली आणि त्यांच्यासाठी बेसन-भाकरी बनविली. राजकीय नाट्यातही शांत राहून, संयम राखून जनतेत जाऊन मिसळण्याची त्यांची ही हातोटी शरद पवारांची आठवण करुन देते.
याच पालखी सोहळ्यातील एक फोटो सध्या सोशल मीडियावर व्हायरल होतोय. पालखीचे दर्शन घेत असताना तेथील पुरोहित स्वतःच्या कुटुंबाला व्हिडिओ कॉल करुन सुप्रिया सुळे दर्शनासाठी आल्या असल्याचे दाखवत होता. सुप्रिया सुळेंच्या ही बाब लक्षात आल्यानंतर त्यांनी देखील संकोच न बाळगता त्या पुरोहिताच्या कुटुंबाशी हितगुज साधले. आज राजकारणात विठ्ठल आणि बडवे हे शब्द अतिशय परवलीचे झाले असताना विठ्ठलासाठी निस्वार्थी भावनेने पायी चालत जात असलेल्या वारकऱ्यांकडे मात्र राजकारण्यांचे दुर्लक्ष होत आहे. या वारकऱ्यांमध्ये मिसळून सुप्रिया सुळे त्यांच्यासारख्याच तुळशी वृंदावन डोक्यावर घेऊन चालतात, तेव्हा चर्चा तर होणारच ना…
