Marathi e-Batmya

मुख्य निवडणूक अधिकाऱ्याची स्पष्टोक्ती, राज्यातील मतदानाच्या टक्केवारीत वाढ नाही

लोकसभा निवडणूकीसाठी २६ तारखेला दुसऱ्या टप्प्यातील मतदान पार पाडल्यानंतर केंद्रीय निवडणूक आयोगाने पहिल्या आणि दुसऱ्या टप्प्यात झालेल्या मतदानाची टक्केवारी तब्बल ११ दिवसांनी जाहिर केली. त्यानंतर महाराष्ट्रासह देशभरातील प्रमुख विरोधी पक्षाच्या नेत्यांनी केंद्रीय निवडणूक आयोगाच्या हेतूविषयी शंका उपस्थित करत मतदान प्रक्रियेबाबत शंका उपस्थित केली.

यासंदर्भात महाराष्ट्राचे मुख्य निवडणूक अधिकारी एस चोकलिंगम यांना मंत्रालय व विधिमंडळात आयोजित पत्रकार परिषदेत सवाल केला असता महाराष्ट्रात मतदानाच्या दिवशी रात्री जी आकडेवारी जाहिर करण्यात आली त्यात कोणताही बदल किंवा वाढ करण्यात आलेली नसल्याचे सांगितले.

यावेळी बोलताना एस चोकलिंगम म्हणाले की, महाराष्ट्रात दुसऱ्या टप्प्यात ८ लोकसभा मतदारसंघात झालेल्या मतदानाची टक्केवारी जी जाहिर करण्यात आली. तीच आकडेवारी आजही तीच आहे. वास्तविक पाहता दिवसभर आणि संध्याकाळी ६ वाजेपर्यंत मतदान करण्यासाठी जे लोक मतदान केंद्राच्या आवारात आले. त्या सर्वांचे मतदान पूर्ण झाल्यानंतर साधारणतः दिवसभरात अंदाजित मतदानाची टक्केवारी आपणाकडून जारी करण्यात येते. दुसऱ्या दिवशी संध्याकाळपर्यंत अंतिम आकडेवारी जाहिर करण्यात येत असल्याचेही यावेळी सांगितले.

एस चोकलिंगम पुढे बोलताना म्हणाले की, अंदाजित आकडेवारी आणि अंतिम आकडेवारी यात सर्वसाधारणपणे १ ते ५ टक्के वाढीची शक्यता असते. २०१९ च्या तुलनेत झालेल्या मतदानाची आकडेवारी पाहिली तर महाराष्ट्रात मतदानाची टक्केवारीत वाढही झालेली नाही की त्यात घटही झालेली नाही. मागील लोकसभा निवडणूकीत जितके मतदान झाले त्याच प्रमाणात मतदान झाले तितकेच मतदान पहिल्या दोन टप्प्यात झालेले असल्याचेही यावेळी स्पष्ट केले.

यावेळी काही प्रसारमाध्यमांच्या प्रतिनिधींनी सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या आदेशाबाबत विचारले असता एस चोकलिंगम म्हणाले की, मी महाराष्ट्रापुरता निवडणूक मुख्यधिकारी आहे. त्यामुळे महाराष्ट्राच्या अनुषंगाने आपण प्रश्न विचारले तर बरे राहिल. आपल्या राज्यात मागील वेळी इतके मतदान होण्यात आपण भूमिका बजावली आहे. मात्र इतर राज्यात गतवेळच्या तुलनेत कमी मतदान झाले आहे, तसेच वाढत्या उन्हाच्यामुळेही मतदान कमी झाल्याची शक्यता आहे. त्यामुळे पुढील तीन टप्प्यात मतदानाची आकडेवारी वाढविण्यासाठी प्रयत्न केले जातील असेही यावेळी सांगितले.

Exit mobile version