Marathi e-Batmya

महाविकास आघाडीच्या नेत्यांच्या भेटीनंतर राज्यपालांनी सांगितले की…

मराठी ई-बातम्या टीम

मागील ८ महिन्यापासून विधानसभा अध्यक्षाचे पद रिक्त असून या पदाकरीता सध्या सुरु असलेल्या हिवाळी अधिवशेनातच निवडणूक घेण्याच्या हालचाली महाविकास आघाडीने सुरु केल्या. त्यापार्श्वभूमीवर राज्यातील महाविकास आघाडीचे नेते मंत्री छगन भुजबळ, मंत्री बाळासाहेब थोरात, मंत्री एकनाथ शिंदे यांनी राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांची भेट घेत सदर निवडणूकीच्या अनुषंगाने माहिती दिली. त्यावर राज्यपालांनी तपासून निरोप कळवतो असे सांगत कोणतेही ठाम आश्वासन देण्यास नकार दिला. त्यामुळे राज्यपाल विधानसभा अध्यक्ष पदाच्या निवडणूकीचा कार्यक्रम जाहीर करण्यास मान्यता देणार का? यावरून आता उत्सुकता निर्माण झाली आहे.

राज्यपालांच्या भेटीनंतर काँग्रेसचे विधानसभेतील गटनेते तथा राज्याचे महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांनी सांगितले की, विधानसभा अध्यक्षाच्या निवडणूकीच्या अनुषंगाने आम्ही राज्यपालांची भेट घेतली. त्यांना यासंदर्भातील माहिती दिली. तसेच काँग्रेसचा उमेदवार अद्याप निश्चित झालेला नसून काँग्रेस पक्षाध्यक्षा सोनिया गांधी या यासंदर्भात निर्णय घेवून पुढील निर्णय कळवतील असे स्पष्ट केले.

तर नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांनी यासंदर्भात राज्यपालांनी कायदेशीर बाबी तपासून निर्णय कळवतो असे सांगितल्याची माहिती दिली.

दरम्यान, महाविकास आघाडी सरकार आणि राज्यपाल कोश्यारी यांच्यातील संघर्ष अद्याप कमी झालेला नाही. काही दिवसांपूर्वीच कुलगुरू नियुक्तीचे राज्यपालांना असलेल्या सर्वाधिकारात कपात करत त्यातील अनेक अधिकारात राज्य सरकारने स्वत:चा वरचष्मा राहील असा प्रयत्न केला आहे. त्यामुळे एकप्रकारे राज्यपालांचे अधिकार कमी केल्यावरून राज्यपाल कोश्यारी यांची नाराजी वाढल्याचे सांगण्यात येत आहे. त्याचबरोबर यापूर्वी राज्यपालांनी विधानसभा अध्यक्ष पदासाठी निवडणूक घेण्याची तीन वेळा सूचना केली होती. परंतु त्या तिन्ही वेळेस महाविकास आघाडीने राज्यपालांची सूचनेबर अमंलबजावणी केली नव्हती.

त्याचबरोबर विधानसभा निवडणूकीसाठी यापूर्वी गुप्त पध्दतीने मतदान घेण्यात येत होते. परंतु त्या नियमात राज्य सरकारने दुरूस्ती करत ही निवडणूक खुल्या आणि आवाजी मतदानाने घेण्याची तरतूद केली. या दुरूस्तीच विधानसभेने बहुमताने मंजूरही करण्यात आला. मात्र महाविकास आघाडीच्या या दुरूस्तीला भाजपाने विधानसभेत कडाडून विरोध केला होता. त्यामुळे राज्यपाल कोश्यारी हे महाविकास आघाडीने दिलेल्या प्रस्तावाला मंजूरी देवून विधानसभा अध्यक्ष पदाच्या निवडणूकीचा कार्यक्रम जाहीर करतात का ? याकडे सबंध राज्याचे लक्ष लागून राहीले आहे.

Exit mobile version