Marathi e-Batmya

बसपा नेता के आर्मस्टाँग यांची हत्याः तपास सीबीआयकडे द्या

बहुजन समाज पक्षाच्या अर्थात बसपा प्रमुख मायावती यांनी तामिळनाडू सरकार पक्षाचे प्रदेश प्रमुख के आर्मस्ट्राँग यांच्या हत्येच्या तपासाबाबत गंभीर नसल्याचा आरोप केला आहे, ज्यांची त्यांच्या निवासस्थानाजवळ ५ जुलै रोजी वार करून हत्या करण्यात आली होती. बसपाच्या प्रमुख मायावती यांनी सदर हत्येचा तपास केंद्रीय अन्वेषण विभागाकडे (सीबीआय) सोपवावा अशी मागणी मुख्यमंत्री एम के स्टॅलिन यांच्याकडे केली.

रविवारी, मायावती, त्यांचे पुतणे आणि बसपाचे राष्ट्रीय समन्वयक आकाश आनंद यांच्यासह के आर्मस्ट्राँग यांना अंतिम श्रद्धांजली देण्यासाठी चेन्नईला पोहोचले. आपल्या कार्यकर्त्यांना संबोधित करताना मायावती यांनी तामिळनाडूतील कायदा आणि सुव्यवस्थेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले.

मायावती पुढे बोलताना म्हणाल्या की, आर्मस्ट्राँगची ज्या प्रकारे हत्या झाली आहे, त्यावरून तामिळनाडूमध्ये कायदा आणि सुव्यवस्था शिल्लक नसल्याचे दिसते. मुख्य गुन्हेगारांना अद्याप अटक करण्यात आलेली नाही, असा आरोपही यावेळी केला.

द्रमुकच्या नेतृत्वाखालील राज्य सरकार हत्येच्या तपासाबाबत गंभीर नसल्याचा आरोप करत मायावती म्हणाल्या, राज्य सरकार या हत्येच्या तपासाबाबत गंभीर नाही अन्यथा गुन्हेगार तुरुंगात गेले असते. राज्य सरकारला न्याय द्यायचा नसेल तर, हे प्रकरण सीबीआयकडे सोपवण्यात यावे अशी मागणीही यावेळी केली.

मायावती पुढे म्हणाल्या की, आम्ही सीबीआय तपासाची मागणी करतो. जर राज्य सरकारने हे प्रकरण सीबीआयकडे पाठवले नाही तर याचा अर्थ या हत्येत त्यांचाही सहभाग आहे असे सूचक विधानही यावेळी केले.

हे एका दलित नेत्याच्या हत्येबद्दल नाही. संपूर्ण दलित समाजाला धोका आहे आणि अनेक दलित नेते त्यांच्या जीवाला घाबरले आहेत, असे मायावती यांनी सांगितले.

मायावतींनी बसपा कार्यकर्त्यांना कायदा हातात घेऊ नये, असा इशाराही दिला. “आरोपींवर कारवाई सुनिश्चित करण्यासाठी, पक्षाच्या कार्यकर्त्यांनी पुढे यावे परंतु त्याच वेळी, कायद्याच्या मर्यादेत राहून, दुर्बल घटक कायदा हातात घेत नाही हे दाखवून द्या, असेही यावेळी सांगितले.

के आर्मस्ट्राँग (52) यांची पेरांबूर परिसरात काही अज्ञात लोकांनी त्यांच्या घराबाहेर वार करून हत्या केली. या घटनेच्या सीसीटीव्ही फुटेजमध्ये असे दिसून आले आहे की, चार हल्लेखोर अन्न वितरण एजंटच्या वेशात होते. या हत्येप्रकरणी किमान आठ संशयितांना ताब्यात घेण्यात आले आहे.

Exit mobile version